लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील दुसऱ्या टप्यातील १९ जागांसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी संध्याकाळी थंडावली. उद्या, गुरुवारी या सर्व मतदारसंघातील ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यासाठी मतदान होणार आहे. तब्बल तीन कोटी २४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
पुणे, बारामती, मावळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आदी १९ लोकसभा मतदार संघात २४ महिलांसह ३५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेले १५ दिवस या मतदार संघांमध्ये प्रचाराचा धुरळा उडला होता. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, गोपीनाथ मुंडे, सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण, पद्मसिंह पाटील, राजू शेट्टी यांच्यासारखे मातब्बर उमेदवार दुसऱ्या टप्यात रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या दिग्गजांसह प्रत्येक मतदारसंघातील लढत चुरशीची होईल, असे एकूण चित्र आहे. हिंगोलीत राजीव सातव हे प्रमुख उमेदवार रिंगणात असून काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. वेगवेगळ्या प्रकरणांत बदनाम झालेले राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील या वेळी पुन्हा जिंकणार का, याचीही मोठी उत्सुकता आहे. मतदानानंतर नव्याने अंदाज घेतले जातील. ४८ तासांत होणाऱ्या घटना, घडामोडींमध्ये अफवांचे पीक ‘हवा’ ठरविणारी असेल.
सरकारी यंत्रणा सक्रिय
 प्रचार थंडावल्यानंतर पडद्याआडच्या हालचालींना वेग देण्याचे काम सुरू झाले आहे. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून वेगवेगळ्या आर्थिक व्यवहार तपासणाऱ्या सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. विशेषत: प्राप्तिकर विभाग व विक्रीकर विभागांतील अधिकाऱ्यांनी त्यांच्या यंत्रणेला सजगतेचे इशारे दिले आहेत. पोलिसांची यंत्रणाही सज्ज असून मराठवाडय़ातील २२९ मतदान केंद्रांसाठी स्वतंत्र यंत्रणा देण्यात आल्या आहेत. मतदान शांततेत व निर्भयतेच्या वातावरणात व्हावे, या साठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.

सर्वाधिक उमेदवार  -बीड (३९)
सर्वात कमी उमेदवार -बारामती (०९)
संवेदनशील मतदानकेंद्रे -२०९
सर्वात संवेदनशील केंद्रे -६५ (सोलापूर)

राज्यात दुसऱया टप्प्यात मतदान होणारे मतदारसंघ आणि महत्त्वाचे उमेदवार पुढीलप्रमाणे
हिंगोली – राजीव सातव (कॉंग्रेस) – सुभाष वानखेडे (शिवसेना)
नांदेड – अशोक चव्हाण (कॉंग्रेस) – डी. बी. पाटील (भाजप)
परभणी – विजय भांबळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – संजय जाधव (शिवसेना)
मावळ – राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणे – विश्वजीत कदम (कॉंग्रेस) – अनिल शिरोळे (भाजप) – दीपक पायगुडे (मनसे)
शिरूर – देवदत्त निकम (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)
बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – महादेव जानकर (रासप)
अहमदनगर – राजवी राजळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – दिलीप गांधी (भाजप)
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (कॉंग्रेस) – सदाशिव लोखंडे (शिवसेना)
बीड – सुरेश धस (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – गोपीनाथ मुंडे (भाजप)
उस्मानाबाद – पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – रवि गायकवाड (शिवसेना)
लातूर – दत्तात्रय बनसोडे (कॉंग्रेस) – सुनील गायकवाड (भाजप)
सोलापूर – सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस) – शरद बनसोडे (भाजप)
माढा – विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – सदाभाऊ खोत (स्वाभिमानी शेतकरी संघटना) – प्रतापसिंह मोहिते पाटील (अपक्ष)
सांगली – प्रतिक पाटील (कॉंग्रेस) – संजयकाका पाटील (भाजप)
सातारा – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – अशोक गायकवाड (आरपीआय)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – निलेश राणे (कॉंग्रेस) – विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर – धनंजय महाडीक (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – संजय मंडलिक (शिवसेना)
हातकणंगले – कल्लाप्पा आवाडे (कॉंग्रेस) – राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)