सुशासन म्हणजे लोकांशी थेट संवाद. यासाठी आपले सरकार ‘फेसबुक’ सोशल साइटचा प्रभावी वापर करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे दिली. ‘फेसबुक’च्या मुख्य संचालन अधिकारी शेरील सँडबर्ग यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदी यांनी शासनाचा मनसुबा व्यक्त केला.
‘फेसबुक’वरील आपल्या पेजवर मोदी यांनी सँडबर्ग यांच्याशी अत्यंत फलदायी चर्चा झाल्याचे म्हटले आहे. सँडबर्ग यांना मोदी यांनी गुरुवारी चर्चेसाठी आमंत्रित केले होते. मोदी यांनी आपण फेसबुकचे चाहते आहोत, त्यामुळे या माध्यमाचा वापर जनता आणि सरकारमधील थेट संवादासाठी करता येईल. भारतात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीही या माध्यमाचा वापर करता येईल, याविषयी सँडबर्ग यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘फेसबुक’च्या मुख्य संचालन अधिकारी झाल्यानंतर सँडबर्ग या पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आल्या आहेत.    यावर सँडबर्ग यांनीही फेसबुकवर मोदींच्या फेसबुक प्रेमाबद्दल भरभरून लिहिले आहे. प्रभावी कारभार करण्यासाठी सोशल साइटचा वापर महत्त्वाचा आहे. यासाठी आपण लोकांशी थेट संवाद साधण्यावर आपला विश्वास आहे, असे मोदींनी आपल्याला सांगितल्याचे सँडबर्ग यांनी बैठकीनंतर म्हणाल्या.