शिवसेनेतून आलेल्या अभिजित पानसे यांना मनसेने ठाणे लोकसभा मतदारसंघातून तर सुरेश म्हात्रे यांना भिवंडीतून उमेदवारी दिली आहे. मनसेने आणखी दोन उमेदवार जाहीर करताना ठाण्यात शिवसेनेविरोधात तर भिवंडीत भाजपविरोधात उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे ठाण्यात चौरंगी लढत होणार असून त्याचा फायदा नेमका कोणाला होणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मनसेने वर्धापनदिन मेळाव्यात पहिली यादी जाहीर करताना मनसेने पुणे वगळता अन्य उमेदवार हे महायुतीत शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांमध्ये उभे केले होते. त्यामुळे मनसेची भाजपशी छुपी युती झाल्याची चर्चा सुरू झाली होती. पण आता भिवंडी येथे भाजप उमेदवाराच्या विरोधातही मनसेने उमेदवार दिला आहे.
ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार संजीव नाईक आणि ‘आप’ चे संजीव साने निवडणुकीच्या िरगणात आहेत. त्यात अभिजित पानसे यांची उमेदवारी मनसेने जाहीर केल्याने मनसे आणि ‘आप’ हे कोणाची मते खाणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. भिवंडीतही भाजपकडून आमदार मंगलप्रभात लोढा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून तेथेही मनसेमुळे कोणाला फटका बसणार, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.