राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रदेशचे अन्य नेते कडवट संघर्षांच्या भूमिकेत असताना माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे मात्र सलगीचे धोरण ठेवून त्यांच्यावर स्तुतीसुमनेच उधळत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेसंदर्भात भाजपची नेमकी भूमिका काय, असा संभ्रम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्येही असून जनमानसात काय संदेश जात असावा, याची चर्चाही सुरू झाली आहे. या विरोधाभासामागे राजकीय व्यूहरचना नव्हे, तर केवळ वितंडवादाचेच कारण असल्याचे समजते.
शरद पवार यांच्याशी गडकरी यांचे चांगले वैयक्तिक संबंध असून त्यांनी रालोआसमवेत यावे, यासाठी गडकरी यांनी प्रयत्न केल्याची बरीच चर्चा रंगली. पवार यांना रालोआसोबत घेण्यास मुंडे यांनी जाहीर विरोध दर्शविला. मुंडे यांनी पवारांवर कठोर टीकास्त्र सोडत अजित पवार यांना तर गैरव्यवहार प्रकरणांमध्ये तुरुंगात पाठविण्याची भाषा गेल्या काही महिन्यांमध्ये वापरली. आगामी निवडणुकांमध्ये मुंडे यांचा पवारांविरूध्दचा संघर्ष अधिक तीव्र होत जाईल, अशीच चिन्हे दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रालोआसोबत आणण्याची भूमिका काही महिन्यांपूर्वी मुंडे यांनी घेतली होती. पण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व राज ठाकरे हे त्यास अनुकूल नसल्याचे पाहिल्यावर त्यांनी याचा नाद सोडला. राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केल्यावर तर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. टोलसह अनेक बाबींवर मनसेविरोधात भाजप नेते तिखट प्रतिक्रिया देत असून निवडणूक काळात त्या अधिकच तीव्र होणार आहेत.
दुसरीकडे गडकरी मात्र पवार आणि राज ठाकरे यांच्याशी सलगी वाढवत असल्याचे दिसत आहे. गडकरी यांच्या नेतृत्वाखालील ‘पूर्ती’ समूहाच्या कार्यक्रमासाठी पवार नागपूरला गेले होते. पवार यांच्यासह रालोआचे दरवाजे सर्वासाठी खुले असल्याचे वक्तव्य गडकरी यांनी केले होते. दोन भावांमध्ये ‘पूल’ बांधण्याचा दावा करणाऱ्या गडकरी यांनी राज यांच्यावर ‘गोदाकाठी’ स्तुतीसुमनेही उधळली. राज यांनीही गडकरी यांचे कौतुक केले.  त्यामुळे पवार आणि राज ठाकरे यांच्याबाबत भाजपची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संघर्ष आणि सलगी अशा दोन्ही पध्दतीने वाटचाल सुरू ठेवून गरज भासल्यास रालोआतील भिडू वाढविण्याची ही व्यूहरचना आहे की गडकरी व मुंडे यांच्यातील मतमतांतराचा हा परिपाक आहे, अशीही चर्चा सुरू झाली आहे.