राज्यात लोकसभेचे तिन्ही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्याने आदर्श आचारसंहिता अशंत: शिथील करण्याचे निवडणूक आयोगाने मान्य केल्याने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्णय घेण्यास मोकळीक मिळणार आहे.
आचारसंहिता शिथील करावी, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अहवाल तयार करणे किंवा कोठे फेरमतदानाची गरज भासणार नाही याची खातरजमा करून येत्या एक-दोन दिवसांत आचारसंहिता शिथील केली जाईल. देशाच्या अन्य भागांमध्ये अद्यापही मतदान बाकी असल्याने सरकारला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. दैनंदिन कामकाजाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होईल, असे निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. सरकारी किंवा निमशासकीय वाहने वापरण्यावरील निर्बंध कायम राहणार आहेत.