काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार ठरवण्यासाठी गुरुवारी झालेल्या मतदानात लातूर जि. प.चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे सर्वाधिक ७६० मते घेऊन विजयी झाले. एक हजार १५८ पात्र मतदार या निवडणुकीस पात्र असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. स्पध्रेत एकूण ७ उमेदवार होते. पकी मतदानाच्या वेळी सहाजण उपस्थित राहिले. यात जि. प. अध्यक्ष बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुनीता आरळीकर, काँग्रेस सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकत्रे जयवंत काथवटे, जि. प. समाजकल्याणचे सभापती बालाजी कांबळे व भारत स्काऊटचे माजी अध्यक्ष भा. ई. नागराळे यांचा समावेश होता. एकूण १ हजार १७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. ७६ मते अवैध ठरली. बनसोडे यांना सर्वाधिक ७६० मते पडली. त्या खालोखाल मोहन माने यांना ८०, जयवंत काथवटे ३३, नागराळे २८, बालाजी कांबळे १९, तर आरळीकर यांना १९ मते मिळाली. औरंगाबादचे रमाकांत जोगदंड यांना एकही मत मिळाले नाही.मतदारांनी विश्वास टाकल्याबद्दल बनसोडे यांनी आभार मानले.