लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो, विधानसभा निवडणुकीकरिता लगेचच तयारीला लागा, असा आदेश राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या नेत्यांना दिला. जून महिन्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता लागू होणार असल्याने मराठा आरक्षण, टोल आणि मागासवर्गीय शिष्यवृत्ती या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर तात्काळ निर्णय घेतला जावा, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी केल्या.
राज्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर शरद पवार यांनी निवडक नेत्यांच्या उपस्थितीत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. छगन भुजबळ, भास्कर जाधव, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, राजेश टोपे आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादीसाठी विधानसभेच्या निवडणुका महत्त्वाच्या असल्याने या निवडणुकांच्या तयारीला लगेचच सुरुवात करावी, असा स्पष्ट आदेश पवार यांनी दिला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑगस्ट महिन्यात लागू होईल. जुलै महिन्याच्या सुरुवातीला विधान परिषदेच्या नागपूर आणि पुणे पदवीधर तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघांत निवडणूक होत आहे. परिणामी जून महिन्यात या चार मतदारसंघांतील आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णय घेण्यात अडचणी येतील. पक्षाच्या दृष्टीने पाच महत्त्वाच्या विषयांवर तात्काळ निर्णय घेतला जावा, अशी सूचना पवार यांनी केली.
मराठा आरक्षणाचा तत्त्वत: निर्णय झाला असला तरी या निर्णयाच्या आड येणाऱ्या साऱ्या त्रुटी दूर करून अंतिम निर्णय घेतला जावा, असे पवार यांनी सुचविले. टोलबाबत पारदर्शक धोरण तयार करून लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने निर्णय घेतला जावा, अशी सूचना करण्यात आली. सामाजिक न्याय आणि वित्त खात्यांमध्ये समन्वय घडवून आणून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचा विषय मार्गी लावा. तसेच एल.बी.टीवरही सरकारने ठोस निर्णय घ्यावा, असा आदेश पवार यांनी दिल्याचे समजते.
आघाडी कायम
लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागो आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केल्याचे बैठकीत उपस्थित असलेल्या एका नेत्याने सांगितले. काही जिल्ह्य़ांमध्ये संघटनेच्या बळकटीबरोबरच काही ठिकाणी दुरुस्ती करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.