गोंदिया : Navratri 2023 Marathi News नवरात्र कालावधीत भाविक मोठ्या संख्येने उपवास करतात. या नऊ दिवसात काही जण तर केवळ फलाहारच करतात, तसेच ऑक्टोबर ‘हीट’ मुळे येथील बाजारात फळांना मागणी वाढली आहे. बाजारात देशी- विदेशी फळांची आवक होत आहे. आणि ग्राहकांना त्यांच्या आवडीची केळी, पपई, पेरू, अननस, ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, काश्मीरचे सफरचंद, अंगूर, संत्री मिळत आहे. जून पासून पावसाने हात आखडल्याने फळबागांतील उत्पादनावर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे एरवी दिवाळी काळात सीताफळांची पाहायला मिळणाऱ्या आवक गत महिन्यापासून होत आहे. तैवान च्या पपईची देखील आवक होत आहे.
डाळिंबाने खाल्ला भाव
मागील दोन महिन्यांपासून डाळिंबांची आवक साधारणच आहे. मागील आठवड्यात ती आणखी घटली. डाळिंबाच्या २० किलो कॅरेटला ३ ते ४ हजार रुपये मोजावे लागत असून, २०० ते २८०- ३०० रुपये किलोपर्यंत किरकोळ भाव आहे.
डेंग्यूमुळे ड्रॅगन फ्रूट, किवी, पपईला मागणी
सणासुदीचे दिवस असले तरी वातावरणातील उष्णता, तसेच डेंग्यू आणि व्हायरल आजारांमुळे प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या ड्रॅगन फ्रूट, किवी आणि पपईला मागणी वाढली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या लाल ड्रॅगनचा ठोक भाव १२० ते १६० रुपये, तर पांढया ड्रॅगनचा भाव ८० ते १२० रुपये किलो ठोक भाव आहे.
रसदार मोसंबी स्वस्त, केळी तेजीत
गोंदिया येथील फळ बाजारात ६०० ते ८०० रुपयांना मोसंबीचे कॅरेट मिळत असून, किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये किलोपर्यंत चांगल्या प्रतीची मोसंबी विकली जात आहे. दुसरीकडे पावसाअभावी केळीच्या बागांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याने आवक घटली आहे. ४५० ते ५०० रुपये कॅरेट ठोक भाव असून, ३० ते ४० रुपये डझन केळीचा भाव आहे. तर किरकोळ बाजारात ७०-८० रुपये (१२) डझन केळीचा भाव आहे.
यंदा पाऊस कमी असल्याचा परिणाम फळांच्या उत्पादनावर झाला आहे. यातच नवरात्र काळात मागणी वाढली असून, आवक कमी आहे. मुंबईच्या वाशी बाजारपेठेतून परदेशी फळांची आवक होत आहे. फळांचे दर वाढलेले असले तरी पण सध्या तरी सामान्यांच्या आवाक्यात आहेत. – नवाब शेख, फळ विक्रेता, गोंदिया