महावितरणच्या वतीने तीन हजार ३७४ ठिकाणी रोहित्रे बसविण्यात  आली आहेत. त्यातील एक हजार ८९० रोहित्रांना संरक्षक जाळ्या बसविण्यात आलेल्या आहेत. तरीही अद्याप एक हजार ४८४ रोहित्रे संरक्षक जाळ्याविना असल्याची बाब उजेडात आली आहे.

या रोहित्रांना महावितरणने संरक्षण जाळ्या बसविण्यात आल्या नसल्याने वसई विरार शहरातील उघडय़ा रोहित्रांची समस्या कायम आहे.

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील रोहित्रांना संरक्षक जाळ्या बसविणे आवश्यक होते. परंतु अनेक ठिकाणच्या भागात व  मुख्य रस्त्याच्या कडेला संरक्षण जाळ्या विना रोहित्र बसविण्यात आले असून त्यामुळे नागिरकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.महावितरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका वसई विरार च्या नागरिकांना बसू लागला आहे. बहुतांश उघडय़ा अवस्थेतील रोहित्र ही रस्त्याच्या कडेला व नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी आहेत.

त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक, शाळकरी मुले यांना अशा ठिकाणाहून प्रवासकरणे धोकादायक झाले आहे. तर काही ठिकाणी रोहित्रांच्या जवळच विविध प्रकारची दुकानेही लावली आहेत. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडली तर हा प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

या उघडय़ा असलेल्या रोहित्रांमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी या रोहित्रांना सुरक्षा रक्षक जाळी बसविण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. त्यानुसार उघडय़ा स्थितीत असलेल्या रोहित्रांना सुरक्षारक्षक जाळ्या बसविण्याचे काम सुरू केले होते.मात्र त्या कामातही दिरंगाई होत असल्याने अजूनही शहरातील १ हजाराहून अधिक रोहित्र ही उघडय़ाच स्थितीमध्ये असल्याचे दिसून आले आहे. शहरात महावितरणकडून  एकूण ३हजार ३७४ रोहित्र बसविण्यात आले असून त्यातील केवळ १ हजार ८९० रोहित्रांना जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. तर इतर ठिकाणी रोहित्रांना जाळ्या बसविण्याचे काम सुरू  असल्याचे महावितरणने सांगितले आहे.

रोहित्रांवर अधिक भार

वसई विरार शहरात लोकसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे वीजग्राहकांच्या संख्येत ही वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार येऊ लागला आहे. यामुळे वारंवार काही वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी अधिक क्षमतेची रोहित्रांची आवश्यकता असल्याचे मत येथील काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.

शहरातील रोहित्रांना संरक्षण जाळ्या बसविण्यासाठीच्या एजन्सीला सूचना केल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी रोहित्रांची दुरुस्तीचे कामे असतील ते सुद्धा सुरूच आहेत.

-राजेश चव्हाण, अधीक्षक अभियंता महावितरण विभाग वसई