महाराष्ट्रात २६०८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ४७ हजार १९० इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये ६० जणांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये ८२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात १३ हजार ४०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज झालेल्या ६० मृत्यूंपैकी ४० मृत्यू मुंबईत, १४ पुण्यात, २ सोलापुरात, १ वसई-विरारमध्ये, १ सातऱ्यात, १ ठाण्यात आणि १ नांदेडमध्ये नोंदवला गेला आहे. ज्या ६० जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये ४१ पुरुष आणि १९ महिला होत्या. ६० पैकी २९ रुग्ण हे ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे होते. तर २४ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. इतर ७ जण हे ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. मागील २४ तासांमध्ये झालेल्या ६० मृत्यूंपैकी ३६ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार होते.

आत्तापर्यंत राज्यात १५७७ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आत्तापर्यंत ३ लाख ४८ हजार २६ जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर ४७ हजार १९० जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३३ हजार ५४५ जणांना संस्थात्मक क्वारंटाइन ठेवण्यात आलं आहे अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.