लॉकडाउनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३०१ गुन्हे दाखल केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य सोशल मीडिया वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३०१गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी १३ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.

यामध्ये बीड २८, पुणे ग्रामीण २४, मुंबई २०, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली १२, नाशिक शहर ११, जालना ११, नाशिक ग्रामीण १०, बुलढाणा १०, लातूर ९, सातारा ९, नांदेड ९, ठाणे शहर ८,परभणी ७, सिंधुदुर्ग ७, नवी मुंबई ७, ठाणे ग्रामीण ६, हिंगोली ६,नागपूर शहर ६, पालघर ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४, रत्नागिरी ४ ,सोलापूर शहर ४, भंडारा ३, चंद्रपूर ३, रायगड २, धुळे २, वाशिम २, पिंपरी- चिंचवड १,औरंगाबाद १ (एन.सी) यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

या सर्व गुन्ह्यांचे जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १२४ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ११२ गुन्हे दाखल करण्यात आले. titktok विडिओ शेअर प्रकरणी ९ गुन्हे व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ५ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत १०० आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी ३८ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .

लातूर जिल्ह्यातील विवेकानंद चौक पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली आहे ,त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या १० वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे कोरोना महामारीबद्दल चुकीची माहिती देणारी पोस्ट टाकल्यामुळे,शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती .

ठाणे शहरांतर्गत खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली आहे ,त्यामुळे ठाणे शहरात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ८ वर गेली आहे .सदर गुन्ह्यात कोणीतरी फिर्यादीच्या मुलास कोरोनाची लागण झाली आहे,व त्यामुळे त्यांस घेऊन गेले आहेत ,तसेच फिर्यादीच्या भावांना देखील लागण झाली आहे, त्यामुळे कोणीही फिर्यादीच्या दुकानातून मटण खरेदी करू नये अशा आशयाचे मेसेज व्हाट्सअँपद्वारे पसरवून फिर्यादी विरोधात अफवा पसरवली होती .

सध्या कोरोना महामारीच्या काळात व्हाट्सअँपवर तसेच अन्य सोशल मिडियावर कोरोनाग्रस्त रुग्णांची नाव व अन्य माहिती प्रसारित होत आहे . महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना अशी विनंती करते की कृपया तुम्हाला अशा आशयाचा काही पोस्ट्स आल्या तर आपण त्या पोस्ट्स पुढे पाठवू नये .रुग्णांची माहिती अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला फॉरवर्ड करत असतील तर तुम्ही त्या व्यक्तीस तसे करण्यापासून परावृत्त करा , व ग्रुप अॅडमिनने अशा सदस्यांची ग्रुपमधून हकालपट्टी करावी आणि ग्रुप सेटिंग ‘only admin ‘ असे करावे . कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती अशा प्रकारे प्रसिद्ध करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यामुळे असे मेसेज ,विडिओ ,किंवा पोस्ट्स टाकणाऱ्या व्यक्तींवर व संबंधित व्हाट्सअॅप ग्रुप अॅमिन्सवर कायदेशीर कारवाई होऊ शकते .

सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये ,केंद्र व राज्य सरकार जे वेळोवेळी नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.