लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात गत तीन महिन्यात करोनाबाधित एकूण रुग्ण व मृत्यू संख्येचा डोंगर झाला आहे. जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळून ७ जुलैला तीन महिने पूर्ण झाले. या कालावधीत परिस्थिती अनियंत्रित झाली. जिल्ह्यात मंगळवारी आणखी एका करोनाबाधित महिला रुग्णाचा बळी गेला आहे. आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला. १६ तपासणी अहवाल सकारात्मक आले, तर दोन दिवसांत रॅपिड टेस्टमध्ये २१ रुग्ण आढळून आले. या ३७ रुग्णांची आज नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १७७९ झाली.

अकोला जिल्ह्यात ७ एप्रिलला करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. आज त्याला तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. यामध्ये २७ एप्रिलपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर सुरू झालेले रुग्ण वाढीचे सत्र आजही कायम आहे. सोबतच मृत्यूचे प्रमाणही प्रचंड वाढले. तीन महिन्यात एकूण रुग्ण संख्या १७७९, तर मृत्यू ९० झाले. त्यामुळे जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती आहे. आज आणखी एका मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण १३४ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ११८ अहवाल नकारात्मक, तर १६ अहवाल सकारात्मक आले आहेत. तसेच दि.५ व ६ रोजी पातूर येथे करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये २१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचा समावेश आज करण्यात आला आहे. सध्या ३५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आज दुपारी उपचार घेताना खैर मोहम्मद प्लॉट येथील ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यांना २७ जून रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळच्या अहवालात १६ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात सात महिला तर नऊ पुरुष रुग्ण आहेत. त्यामध्ये कच्ची खोली येथील पाच, अकोट येथील तीन, सिंधी कॅम्प व नानकनगर येथील प्रत्येकी दोन तर जीएमसी, पक्की खोली, आदर्श कॉलनी, अकोट फैल येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालात एकही सकारात्मक रुग्ण आढळून आला नाही. ८५ अहवाल नकारात्मक आले.

७४.९२ टक्के रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात करोनातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. आतापर्यंत ७४.९२ टक्के रुग्णांची करोनावर मात केली. सर्वोपचार रुग्णालयातून काल रात्री दोन व आज दुपारनंतर पाच जणांना, तर कोविड केअर केंद्रातून ४० अशा एकूण ४७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात एकूण १३३३ रुग्णांनी करोनावर विजय मिळवला आहे.
१०९८८ नकारात्मक अहवाल
आजपर्यंत एकूण १२८४६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १२४३७, फेरतपासणीचे १५३ तर वैद्याकीय कर्मचाऱ्यांचे २५६ नमुने होते. आजपर्यंत एकूण १२७४६ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या १०९८८ तर सकारात्मक अहवाल १७५८ आहेत. रॅपिड टेस्टचे २१ मिळून एकूण रुग्ण संख्या १७७९ वर पोहोचली.