जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने पोलिसांची नजर चुकवून पळ काढला होता. मात्र, कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी अवघ्या चार तासात त्याला पुन्हा पकडले. विठ्ठल तुकाराम आटूगडे असे या कैद्याचे नाव आहे.

विठ्ठल हा मूळचा शिराळा तालुक्यातील आटूगडेवाडी येथील रहिवासी आहे. खून, बलात्कार प्रकरणी तो येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. काल त्याला आयटीआय संभाजीनगर येथे कामासाठी  तुरुंगातील पोलीस घेऊन जात होते. तेव्हा त्यांची नजर चुकवून त्याने पलायन केले होते.

या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तपासाचे आदेश दिल्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी शोध पथक पाठवले. विठ्ठल हा शेंडा पार्क दिशेने गेल्याची त्यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार परिसरात पोलीस शिपाई वैभव दद्दीकर व जितेंद्र भोसले यांनी झाडी झुडुपात तपास सुरू केला. विठ्ठल यांनी अंगावरील कैद्याचा शर्ट काढून टाकला होता. दरम्यान, पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला, शिवाय पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर दगडफेकही केली. तरीही त्याला न जुमानता यो दोन पोलिसांनी त्याला पकडले. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांनी दद्दीकर व भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.