Lok Sabha Election 2019 : शिवसेना आणि भाजपात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती झाली असली तरी या युतीचे पडसाद दोन्ही पक्षांमध्ये उमटण्याची चिन्हे आहेत. याची सुरुवात अहमदनगरपासून झाली असून अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी गुरुवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

काही महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. कार्यकर्ते स्वबळावर लढण्याच्या मनस्थितीत असतानाच भाजपाने शिवसेनेशी चर्चा सुरु केली आणि अखेर दोन्ही पक्षांची निवडणुकीच्या तोंडावर युती झाली. आता युती झाल्याने पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अहमदनगरमधील घनश्याम शेलार यांनी गुरुवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. युतीच्या निर्णयामुळे कार्यकर्ते निराश झाले असून या निर्णयामुळेच आपण शिवसेनेतून बाहेर पडत असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनशाम शेलार यांनी दिली.

शेलार म्हणाले की, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल असे जाहीर करण्यात आले होते. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे संदेश देण्यात आले होते, मात्र अचानक यू टर्न घेत राज्यात भाजप आणि शिवसेना युती झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे राज्यातील हजारो शिवसैनिकांची निराशा झाली. राज्यात युती करत असताना कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याने आपण शिवसेनेतून बाहेर पडत असल्याचे शेलार यांनी सांगितले.

संपर्क प्रमुख जो अहवाल देतील तो अहवाल प्रमाण मानला जातो. त्यामुळे प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे कुणी पाहत नाही. संपर्कप्रमुख हे वास्तव सांगण्याऐवजी स्वत:च्या हिताचे सांगतात, असे सांगत संपर्कप्रमुखच शिवसेना संपवायला निघाले असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेलार आणि पक्षांतर
घनश्याम शेलार पूर्वी भाजपमध्ये होते, नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. पुन्हा त्यांनी पक्ष बदलला व त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेलार यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचे संकेत दिले होते, त्यानुसार त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती. मात्र, युती झाल्याने शेलार यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.