News Flash

अजिंक्य रहाणेनं केलं आदित्य ठाकरेंच्या निर्णयाचं कौतुक

आठ सागरी किनाऱ्यांवर बीच शॅक्सला सरकारची मान्यता

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास राज्य सरकामे मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे बीच शॅक्स तात्पुरत्या हंगामी स्वरुपातील असतील. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर आणि तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली आणि दिवेआगार तर पालघर जिल्ह्यातील केळवा आणि बोर्डी या आठ किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील.

राज्यात पर्यटन मंत्रालय सांभाळणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली.

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनंही या निर्णयाबद्दल आदित्य ठाकरेंचं कौतुक करत ही सुविधा सुरु झाल्यानंतर मला सुमद्रकिनाऱ्यावर जायला नक्की आवडेल असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती बीच शॅक्स उभारण्यास परवाना देण्यात येईल. एका चौपाटीवर कमाल १० बीच शॅक्स उभारता येतील. स्थानिकांना ते उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून पुढील वर्षापासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल.

तसेच निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिकांसाठी ८० टक्के जागा राखीव असतील. या बीच शॅक्सचे तीन वर्षाकरिता वाटप करण्यात येईल. त्यांचा आकार १५ फूट लांबी आणि १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असेल. गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल. कुटी मिळणाऱ्या व्यक्तीकरिता परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे नापरतावा मुल्य असेल. तसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अनामत रक्कम जमा करावी लागेल, जी तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल. बीच शॅक्स चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत. बीच शॅक्स सकाळी सात ते सायंकाळी सात अशा वेळेत सुरु ठेवता येईल. तसेच संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 4:05 pm

Web Title: ajinkya rahane praises aaditya thackrey on his decision to promote tourism in state psd 91
Next Stories
1 “…तो अति आत्मविश्वास नडला”, करोनावर मात केल्यानंतर धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना
2 करोनाचा मानसिक हल्ला होऊ देऊ नका; धनंजय मुंडेंचा मोलाचा सल्ला
3 हृदयद्रावक! : तीन वर्षाच्या चिमुरडीची हत्या करून आईनेही घेतला गळफास
Just Now!
X