मंत्री हा सरकारचाच एक भाग असतो व त्याच्यावर होणारे आरोप सरकारवरच असतात. मात्र, भाजप नेते या संदर्भात वेगळा तर्क देत आहेत. राज्यातील भाजप सरकारवर कोणतेही आरोप होत नसून फक्त काही मंत्र्यांवर आरोप केले जात आहे, असा युक्तिवाद भाजपचे नेते व महाराष्ट्राचे सहप्रभारी खासदार राकेश सिंह यांनी के ला आहे.
मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा मलीन होत नाही का, असा प्रश्न त्यांना केला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्य सरकार किंवा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अद्याप कुठलेही आरोप झालेले नाहीत. काही मंत्र्यांवर आरोप झाले आहेत. केवळ आरोपाच्या आधारावर राजीनामा देण्याची गरज नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते निराशेतून हे आरोप करीत आहेत. सरकारने चौकशी करण्याची तयारी दर्शविली आहे.
राज्यात एक कोटींवर सदस्य
भाजपतर्फे राबविण्यात येत असलेल्या महाजनसंपर्क अभियानाचा आढावा घेण्यासाठी सिंह दौऱ्यावर आले आहेत. देशात भाजपने ११ कोटी सदस्य नोंदणी केली. राज्यात ही संख्या १ कोटी ५ लाख आहे. नागपूर शहरातही विक्रमी म्हणजे ६ लाख १३ हजार नागरिकांना भाजपचे प्राथमिक सदस्य करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी मोहिमेचा दुसरा टप्पा महासंपर्क अभियानाचा असून त्याद्वारे ज्यांनी सदस्यता नोंदणी केली त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना भाजपच्या ध्येय-धोरणांची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा, तालुका पातळीवर शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

‘व्यापम’ प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही
मध्य प्रदेशात गाजत असलेल्या व्यापम घोटाळ्याची चौकशी योग्य दिशेने सुरू आहे. मध्य प्रदेश सरकार या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे राकेश सिंह म्हणाले. सिंह जबलपूरचे खासदार आहेत, हे येथे उल्लेखनीय. व्यापमवरून म. प्र. सरकारवर होत असलेल्या आरोपाच्या संदर्भात सिंह यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश शिवराजसिंह चौहान सरकारनेच दिले होते. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली याचा तपास सुरू होता. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत असून त्याला म. प्र. सरकारने संमती दिली आहे. यातून सत्य बाहेर येईल.