25 September 2020

News Flash

पवार यांच्या माळशिरस भेटीतून मोहिते-पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न?

माळशिरस तालुक्यात पवारांनी मोहिते-पाटील विरोधकांची भेट घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ातील राजकारण पवार गांभीर्याने घेत असल्याचे दिसते

एजाज हुसेन मुजावर

करोना विषाणूचा फैलाव आटोक्यात येत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोलापुरात धावून आले. त्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईहून दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाशी संवाद साधून करोनावर मात करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या. या निमित्ताने सोलापुरात प्रशासन गतिमान झाले आहे. सोलापुरात येताना वाटेत अकलूज तथा माळशिरस तालुक्यात पवारांनी मोहिते-पाटील विरोधकांची भेट घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ातील राजकारण पवार गांभीर्याने घेत असल्याचे दिसते. मोहिते-पाटील यांना जाणीवपूर्वक डिवचण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते.

सोलापूरची करोना परिस्थिती जाणून घेण्याच्या निमित्ताने आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सोबत घेऊन पवार बारामती येथून प्रथम माळशिरस तालुक्यात आले. कन्हेर येथे रमेश पाटील नावाच्या एका सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी पवार यांनी धावती भेट दिली.

ही सांत्वनपर भेट होती खरी; परंतु त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात सर्वाच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर पवार यांनी माळशिरस येथे डॉ. रामदास देशमुख आणि शंकर देशमुख यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर हजेरी लावली. तसेच वेळापूर येथे उत्तम जानकर यांच्या आलिशान बंगल्यात जाऊन तेथेही पवार यांनी खलबते केली. प्रत्येक ठिकाणी पवार यांनी १० ते १५ मिनिटे वेळ दिला. त्यांच्या भेटीतून माळशिरस तालुक्यातील राजकारणाबाबत गेलेल्या संदेशाची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ासह आसपासच्या इंदापूर आणि बारामती भागात होत आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कुटुंबीय राष्ट्रवादीची वर्षांनुवर्षांची साथ सोडून भाजपमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मोहिते-पाटील यांच्यातील संघर्ष यापूर्वीच उघड झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत माढय़ाची प्रतिष्ठेची जागा मोहिते-पाटील यांच्या ताकदीच्या जोरावर भाजपने राष्ट्रवादीच्या ताब्यातून हिरावून घेतल्यानंतर मोहिते-पाटील यांच्याशी राष्ट्रवादीने अधिकृतपणे फारकत घेतली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने माळशिरसची मोहिते-पाटील यांच्या घरातील जागा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचे मोल म्हणून भाजपने अलीकडे युवा नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांना विधान परिषदेवर सामावून घेतले आहे. तर आपण अजूनही राष्ट्रवादीतच असल्याचे गमतीने सांगणाऱ्या विजयसिंह मोहिते-पाटील यांची भूमिका आतापर्यंत गुलदस्त्यात होती. भाजप प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रितांच्या यादीमध्ये थेट विजयसिंहांचा समावेश झाल्यामुळे अखेर त्यांचीही भूमिका उघड झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत सुप्त स्वरूपात राहिलेला पवार आणि मोहिते-पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष आता थेट रस्त्यावर आला आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांच्या विरोधकांशी पवार यांनी जवळीक साधून त्यांना बळ देण्याचे इरादे सूचित केले आहेत. अनेक वर्षे मोहिते-पाटील यांच्यावर निष्ठा वाहिलेले डॉ. रामदास देशमुख आणि शंकर देशमुख यांनाही पवार यांनी जाळ्यात ओढले आहे. त्यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर सदिच्छा भेट देऊन मोहिते-पाटील यांच्या विरोधात ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न पवारांनी हाती घेतल्याचे दिसून येते.

पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार यांना मोहिते-पाटील यांचीच अडचण होती, असे म्हटले जाते. मनापासून नसले तरी वेळ प्रसंग पाहून या दोघा नेत्यांना एकमेकांशी जुळवून घेणे भाग पडले होते. मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीत सुरुवातीपासून निष्ठा दाखवली, परंतु पवारांनी वेळ येताच मोहिते-पाटील यांना २००९च्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीत ‘कात्रजचा घाट’ दाखविला होता. एव्हाना, शरद पवार यांनी माढय़ाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करून जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदींच्या माध्यमातून मोहिते-पाटील यांची कोंडी करण्यास सुरुवात केली होती. दुय्यम दर्जाचे नेते पवारांच्या आशीर्वादाने मोठे होत असताना जिल्ह्य़ातील मोहिते-पाटील गट कमकुवत करण्याचे प्रयत्न कसोशीने केले गेले. अपमान सहन करणाऱ्या मोहिते-पाटील यांनाही राजकीय भूमिका घेता येत नव्हती.

२०१४च्या मोदी लाटेत माढा लोकसभेची जागा पवारांनी स्वत: लढविण्याऐवजी विजयसिंह मोहिते-पाटील यांना लढण्यासाठी दिली. त्यावेळी मोदी लाटेतही मोहिते-पाटील  वैयक्तिक करिष्म्यामुळे निवडून आले होते. त्यानंतर पुढील म्हणजे गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत माढय़ातून मोहिते-पाटील यांना डावलण्याचे डावपेच स्पष्ट होताच अखेर राजकीय भूमिका घेणे मोहिते-पाटील यांना भाग पडले, असे सांगितले जाते. त्यांना भाजपच्या रूपाने भक्कम पर्याय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अकलूजमध्ये सभा घेऊन मोहिते-पाटील यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता.

शह-काटशह

मोहिते-पाटील भाजपमध्ये स्थिरावले असताना आता शरद पवार यांनी माळशिरस तालुक्यातील राजकारणात मोहिते-पाटील यांना शह देण्यासाठी गांभीर्याने पावले टाकायला सुरुवात केली आहे. मोहिते-पाटील यांच्यापासून जी जी मंडळी दुरावली आहेत, त्यांची पात्रता कितीही आणि कशीही असली तरी त्या सर्वाच्या मागे ताकद उभी करण्याचा पवार यांचा प्रयत्न असल्याचे दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 12:20 am

Web Title: an attempt to dissuade mohite patal from pawars visit to malshiras abn 97
Next Stories
1 मालेगावमधील करोना रुग्णांचा सरकारी रुग्णालयांवर विश्वास
2 रत्नागिरीत १०२ नवे करोनाबाधित
3 रायगड जिल्ह्यात करोनाचे ४३९ नवे रुग्ण
Just Now!
X