अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर; राष्ट्रवादीची पूनम महाजन यांच्यावर टीका

आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संतुलन ढासळत चालले असून, विरोधकांना कुत्रे संबोधून त्यांनी राजकीय संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीवर नेल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृतांचा आहे हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे याकडे अशोकरावांनी लक्ष वेधले आहे.

फडवणीस यांच्या विधानाचा चव्हाण यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे. अनेक थोर नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले, परंतु राजकीय संवादाचा स्तर कधीही ढासळू दिला नव्हता. विरोधक हे लोकशाहीमधील महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. काँग्रेस सरकारच्या काळात नेहमीच विरोधकांचा योग्य सन्मान करण्यात आला. आगामी निवडणुकीत जनता भाजपला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडून तक्रार

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या विरोधात समाजमाध्यमांमध्ये बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात महिला काँग्रेसच्या वतीने मुंबई पोलिसांच्य सायबर विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली. राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, जेनेट डिसोझा, अंजता यादव आदी महिला पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.

राष्ट्रवादीकडून निषेध

भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर खासदार पूनम महाजन यांनी अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका केल्याबद्दल मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी महाजन यांचा निषेध केला आहे. महाजन यांनी अन्य पक्षातील नेत्यांवर टीका करण्यापूर्वी स्वपक्षात काय चालले आहे याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला राष्ट्रवादीने दिला आहे.