‘फटा पोस्टर निकला झिरो’ अशी भाजपची अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीका करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. खोटे बोला पण रेटून बोला हे भाजपचे धोरण आता जनतेच्या लक्षात आले आहे असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. चंद्रपुरात झालेल्या जनआक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.

शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली? कर्जमाफीसाठी ‘तारीख पे तारीख’ सुरूच आहे. मात्र गरीब शेतकऱ्याच्या हाती एकही पैसा आला नाही असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार होते तेव्हा आम्ही एका रात्रीत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. या सरकारला कर्जमाफी करण्याची इच्छा नाही. लाखो शेतकऱ्यांना काँग्रेसने दिलासा दिला. मात्र हे सरकार नुसते घोषणाच करत बसले आहे. शेतकरी आत्महत्येप्रकरणी फडणवीस सरकारवर ३०२ चा गुन्हा का दाखल करू नये? असाही प्रश्न चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात विचारला.

आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, जर विदर्भ पेटला तर तुमचे सरकार राहणार नाही. लोकांची क्रूर थट्टा या सरकारने लावली आहे. फक्त शेतकरीच नाही तर राज्यातील प्रत्येक घटक नाराज आहे. बस कर्मचाऱ्यांनी चार दिवस संप पुकारला तर त्यांचा महिन्याभराचा पगार कापला. निजामाच्या काळातही इतके जुलुम जनतेवर होत नव्हते तेवढे आत्ता होत आहेत. व्यापारीसुद्धा भाजप सरकारला वैतागले आहेत.. ‘एकही भूल कमलका फूल’ अशी घोषणा व्यापारीच देत आहेत. गुजरातमधला व्यापारीही भाजपला वैतागला आहे. राज्यात बदलाचे वारे वाहू लागले आहेत, हे आपल्याला नांदेड महापालिकेच्या निकालाने दाखवून दिलेच आहे, असेही मत चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात मांडले.

भाजपविरोधात सुरू केलेल्या जनआक्रोश मेळाव्यात विदर्भात मात्र फूट पडलेली दिसून आली. अशोक चव्हाण यांना समर्थन देणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय वडेट्टीवाराच्या नेतृत्त्वाखाली तर त्यांच्यावर  नाराज असलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा नरेश पुगलियांच्या नेतृत्त्वाखाली झाल्याचे बघायला मिळाले. विदर्भात झालेल्या या प्रकारामुळे काँग्रेसमधला उभा दावा पुन्हा एकदा समोर आला.