स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तपस्वी क्रांतीकाराला बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मुखपत्राला पोलीस कारवाईपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अभय दिलं. आता तेच मुख्यमंत्री सावकर स्मारकात दसरा मेळावा घेत आहेत. अहो किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असा टोला भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.


काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरी या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दोन लेख प्रकाशित करण्यात आले. यापैकी एका लेखात वीर सावरकर यांचा उल्लेख बलात्कारी आणि दुसऱ्या लेखात त्यांचा उल्लेख माफीवीर असा करण्यात आला. त्यामुळे या पुस्तकावर तातडीने बंदी घालावी आणि काँग्रेसने या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली होती. एवढंच नाही तर सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली आहे का असाही प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता.

आता शिवसेनेने दसरा मेळावा सावरकर स्माकात घेण्याची तयारी सुरु केली आहे. यामुळे संतापलेल्या भाजपाने आठ महिन्यांपूर्वी वीर सावरकरांची बदनामी झाली तेव्हा गप्प बसलात आता सावरकर स्मारकात दसरा मेळावा घेताना किमान मनाची तरी लाज वाटू द्या असं म्हणत टीका केली आहे. शिवसेनेने शिदोरी मधल्या दोन लेखांबाबत मौन धारण केलं. तसंच कोणतीही कारवाई त्यावेळी झाली नाही.

जानेवारी महिन्यात वीर सावरकर कितने वीर या नावाने काँग्रेस सेवा दल प्रशिक्षण शिबिरात पुस्तिका वाटण्यात आल्या. ज्या पुस्तिकेत सावरकर यांच्यांशी संबंधित वादांची माहिती देण्यात आली. मात्र हीच पुस्तिका अत्यंत वादग्रस्तही ठरली. कारण यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त लिखाण करण्यात आलं आहे. वीर सावरकर समलिंगीही होते असाही उल्लेख या पुस्तकात होता. यामुळे बराच वादंग माजला होता. मात्र शिवसेनेने या सगळ्यावर मौन धारण केलं. आता शिवसेना त्यांचा पारंपरिक दसरा मेळावा सावरकर स्मारकात घेण्याच्या तयारीत आहे. त्यावरुन भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना किमान मनाची तरी लाज वाटते का? असा प्रश्न विचारला आहे.