महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे वादग्रस्त ठरलेल्या ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांना मंगळवारी त्यांची पत्रकार बैठक सुरू असताना चार कार्यकर्त्यांनी काळे फासले. महामंडळाचे अध्यक्ष असताना प्रस्ताव मंजूर का केले नाहीत, असा या कार्यकर्त्यांचा सवाल होता. मात्र, या घटनेमुळे व्यथित झालेल्या मानेंनी आपल्या विरोधात षड्यंत्र रचले जात असून, आपण निष्कलंक असल्याचे सांगत या प्रकरणी पोलिसात तक्रार न करण्याची भूमिका घेतली.
येथे मंगळवारी आयोजित केलेल्या भटक्या विमुक्त जाती, जमातींच्या मेळाव्यासाठी वसंतराव नाईक महामंडळाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण माने आले होते. साताऱ्यात महिलांनी केलेल्या तक्रारीमुळे वादग्रस्त ठरलेल्या माने यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहात पत्रकार बैठक आयोजित केली होती. साडेअकराच्या सुमारास ही बैठक सुरू असतानाच शहरातील आसाराम गायकवाड, शहाजी गायकवाड व त्यांच्या काही समर्थकांनी मध्येच घुसून माने यांना महामंडळाचे अध्यक्ष असताना फायली मंजूर का केल्या नाहीत, असा जाब विचारणे सुरू केले. याच वेळी काही कार्यकर्त्यांनी थेट मानेंच्या जवळ जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासले. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला व बैठक उधळली गेली.
माने यांनी आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत. आपल्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचले गेले आहे. मात्र, आपण निष्कलंक आहोत. झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करून पोलिसात तक्रार करणार नसल्याचे माने यांनी सांगितले.