मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामाची आणि आरोग्यविषयक उपाययोजनांची माहिती दिली. त्याचबरोबर राज्यातील राजकारणावरूनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चिमटे काढले. मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर भाजपानं शाब्दिक वार केला आहे. “राजकारण करु नका हे नेमकं कुणाला सांगताय? खासदार संजय राऊत आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना?,” असा सवाल भाजपानं मुख्यमंत्र्यांना केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्रासह मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांना जागा शिल्लक नाही. खाजगी रुग्णालये दाद देत नाहीत. खाटा उपलब्ध नाहीत. व्हेंटिलेटर नाहीत. नर्स, डाँक्टर नाहीत. रुग्णवाहिका मिळत नाहीत, म्हणून रुग्ण दगावत आहेत. रुग्णांचे हाल होत असून, दुर्दैवी चित्र महाराष्ट्रात आहे. तर दुसरीकडे शेतकरी, विद्यार्थी, बलुतेदार, कामगार, मुंबईकर केंद्राप्रमाणे राज्य शासनाकडून काही तरी मदतीची अपेक्षा करत आहे. त्यामुळे तातडीने महाराष्ट्राने मदतीचे पॅकेज जाहीर करावे,” अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

“मुख्यमंत्री म्हणतात.. आधी करोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार..! आमच्या कोकणी भाषेत “म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का?” मग तुम्ही विरोधी पक्षात होतात, त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करीत होतात ते काय होते? फसवणूक? आता बोलून नाही, करुन दाखवा! अडचणीत आलेला शेतकरी, बलुतेदार, महिला बचत गट, छोटा उद्योजक, विद्यार्थी, कामगार,आणि मुंबईकर, करदाते .. यांना काही तरी मदत करावी असे वाटत नाही का?,” असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

“राजकारण करु नका हे नेमकं कुणाला सांगताय? खा.संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना? ते खाजगीत ऐकत नाहीत म्हणून असे सार्वजनिक सांगताय का? काय चाललंय काय, कळायलाच मार्ग नाही. म्हणे ‘आम्ही करणार म्हणजे करणारच!’ कधी? महाराष्ट्र हेच म्हणतोय साहेब आता तरी करुन दाखवा! एकदा म्हणता पावसाळ्यापूर्वी करोनातून महाराष्ट्राला मुक्त करु.आता म्हणता रुग्णांची संख्या वाढणार. एकदा म्हणता केंद्राच्या पथकाने आकडे दिलेच नाहीत. आता म्हणता, पथकाने दिले त्यापेक्षा कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रोज भाषण दिशा बदलतंय. आता बोलून नको, करुन दाखवा,” असा टोला शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader asked to uddhav thackeray about state politics bmh
First published on: 24-05-2020 at 19:36 IST