माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४मध्ये शिवसेनेकडून आलेल्या प्रस्तावाविषयी गौप्यस्फोट केला होता. शिवसेनेच्या या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. काँग्रेस-शिवसेनेमध्ये झालेल्या राजकीय प्रस्तावावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांचेच कान टोचले आहे. “२०१४मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. शिवसेनेला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. यात शिवसेनेनं भाजपाला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच येत नाही,” अशा शब्दात खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला.

एकनाथ खडसे हे अक्कलकोटमध्ये आलेले असताना त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेनं काँग्रेसला दिलेल्या राजकीय प्रस्तावावर ‘टीव्ही९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना भूमिका मांडली. एकनाथ खडसे म्हणाले, “भाजप आणि शिवसेना २०१४ मध्ये स्वतंत्र लढले होते. युती नव्हती. स्वबळावर त्यावेळी भाजपने निवडणूक लढवली होती. स्वाभाविकपणे भाजपचे स्वबळावर सरकार येत आहे, असं दिसताना, अन्य पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया केली असावी. त्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा सरकारमध्ये येण्यासाठी असे विविध प्रयोग यापूर्वीही करण्यात आले होते. अशा स्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये तथ्य असेल. २०१९ मध्ये आम्ही युती म्हणून एकत्र लढलो. तरीही काही मतभेद असल्यामुळे, टोकाचे मतभेद झाल्याने, सरकार टिकू शकलं नाही. त्यामुळे आज महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आले,” असं खडसे म्हणाले.

शिवसेनेला स्वातंत्र्य होते-

“आज एकमेकांच्या विरोधात तत्व आणि विचार असताना भाजपविरोधात सत्ता स्थापन झाली. कदाचित तसा विचार २०१४ मध्येही झाला असावा. त्यामुळेच प्रयत्न झालेच असतील. शिवसेनेने भाजपला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही. कारण दोन्ही पक्ष २०१४ मध्ये वेगळे लढले होते. त्यामुळे वेगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य शिवसेनेला होते. २०१४ मध्ये आम्ही एकत्र लढूनही टोकाचे मतभेद झाले. त्यामुळे आजचं हे सरकार स्थापन झाले आहे. भाजपचं सरकार स्थापन झालं नाही”, असंही खडसे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“अत्यंत आश्चर्यकारक आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने हे वक्तव्य केल्याने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. यामधून शिवसेनेचा खरा चेहरा उघड होतो आहे. विचारधारा, तत्वं, मूल्य अशा काहीच गोष्टी नाहीत का ? सत्ता हेच त्यांच्यासाठी सगळं आहे का ? एकदा शिवसेनेने खुलासा केला पाहिजे,” असं फडणवीस दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.