News Flash

“राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक”, प्रविण दरेकरांनी राज्य सरकारला सुनावले!

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर अनिल देशमुखांवरील कारवाईवरून परखड टीका केली आहे.

pravin darekar on mahavikasaghadi
प्रविण दरेकरांची सरकारवर खोचक टीका

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालकीच्या ४ कोटी २० लाख रुपये किंमतीच्या दोन मालमत्तांवर आज ईडीनं जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर भाजपाकडून आता महाराष्ट्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचा एकूण आकडा १०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा दावा केला असतानाच आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अनिल देशमुख यांच्यावरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईवरून राज्यातील सत्ताधाऱ्यांना परखड शब्दांमध्ये सुनावले आहे. “ही कारवाई म्हणजे राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना चपराक आहे”, अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी राज्यातील तिनही सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र सोडलं आहे.

“आता त्यांचं समाधान होईल”

अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता आरोप करणाऱ्यांचं समाधान होईल, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत. “राजकीय सूडापोटी केंद्र सरकार आणि एजन्सी काम करतायत असं बोलणाऱ्यांना ही चपराक आहे. जर तपासात मालमत्ता जप्त झाली, याचा अर्थ त्या तपासात तथ्य आहे. अशा कोणत्याही यंत्रणेला मनमानी करता येत नाही. आता भाजपावर, केंद्रावर आणि तपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांचं समाधान होईल. आता या प्रकरणात सत्यता असल्याचं दिसून आलं आहे. भविष्यात यातील तथ्य आणि सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

 

अनिल देशमुखांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई!

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ईडीनं याआधीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावले असताना आता त्यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केली आहे. अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2021 4:56 pm

Web Title: bjp pravin darekar slams shivsena ncp congress over ed attachment action on anil deshmukh pmw 88
Next Stories
1 SSC Results 2021: बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना
2 “स्वप्नील लोणकरसारखा मार्ग कोणी पत्करला तर…”; गोपीचंद पडळकरांचं उद्धव ठाकरेंना इशारा
3 रायगड मधील ३२८ मुलांचे मायेचे छत्र करोनाने हिरावले
Just Now!
X