News Flash

आरक्षणामुळे माणसं दुरावत आहेत, गुणवत्तेला प्राधान्य द्यायला पाहिजे !

मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम

फाइल फोटो

भाजपाचे राज्यसभेचे खासदार आण सातारच्या गादीचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आपलं परखड मत मांडलं आहे. मराठा समाजात राजकारण नसतं तर मागेच आरक्षण मिळालं असतं. मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे. आरक्षणामुळे समाजात दुरावा निर्माण झाल्याची खंतही उदयनराजे यांनी बोलून दाखवली.

“छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जात-पात मानली नाही, मी स्वतःला कधीही मराठा म्हणून समजून घेतलं नाही. खरं तर गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.” उदयनराजे सातारा पालिकेच्या आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली, तिच शिकवण आजही अमलात आणली पाहिजे असंही उदयनराजे म्हणाले.

जात-पात लोकांनी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केली आहे. इतर जातीचं आरक्षण काढून घेऊ नका. आर्थिक स्तरावर केंद्र शासनाने व अन्य राज्यांनी आरक्षण लागू केले आहे त्याचाही विचार व्हायला काय हरकत आहे. आंदोलन करणाऱ्या मराठा संघटना व कार्यकर्त्यांना मी आपलं उद्दिष्ट काय असं विचारले तर कोणीही बोलत नाही. मला या विविध संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम दिसून आल्याचं परखड मत उदयनराजेंनी बोलून दाखवलं. सातारा पालिकेच्या उपाध्यक्षपदी मनोज शेंडे यांची बिनविरोध झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले हे पालिका कार्यालयात आले. तेथे त्यांनी उपाध्यक्ष मनोज शेंडे यांचे अभिनंदन केले. यादरम्यान पत्रकारांनी उदयनराजेंना मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलतं केलं.

जीवाला जीव देणारे सख्खे मित्र दूर झाले –

माझ्याकडे सर्व जाती धर्माचे लोक कार्यरत आहेत. लहानपणी गोट्या, विटया दांडू खेळायचो तेव्हा तुम्ही जात पहायचात का?? या आरक्षणामुळे लोक एकमेकांशी बोलण्याचे बंद झाले. लहानपणापासूनचे जीवाला जीव देणारे सख्खे मित्र दूर झाले. एकमेकाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. या आरक्षणामुळे सर्व समाजात उद्रेक होईल. अमेरिकेत वर्णभेदातून जसा उद्रेक झाला तसा आपल्याकडे होईल. तर सगळ्याच गोष्टीचे राजकारण करायचे नसतं. राजकारण केलं असतं तर मागेच आरक्षण मिळाले असतं.

  • उदयनराजे भोसले,  राज्यसभा खासदार (भाजपा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 9:38 pm

Web Title: bjp rajya sabha mp udayanraje bhonsle straight forward thoughts on maratha reservations psd 91
Next Stories
1 अर्णब गोस्वामींना अंतरिम दिलासा नाही; याचिकेवर मुंबई हायकोर्टात होणार उद्या सुनावणी
2 Coronavirus: राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१.०७ टक्क्यांवर
3 शब्दांचे फुलबाजे उडवा, रोज उघडे पडा; आशिष शेलारांचा राऊतांना टोला
Just Now!
X