रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन

कराड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी हा मुद्दा पुढे येईल, तेव्हा भाजपला लोकसभेच्या निश्चित जादा जागा मिळतील आणि नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कराड येथे बोलताना व्यक्त केला. राफेल विमान खरेदीप्रकरणी न्यायालयाने क्लीन चिट दिल्याने याबाबत अधिक चर्चा करणे योग्य होणार नसल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस आघाडीच्या काळातील राफेल विमानाची किंमत ही मोकळय़ा पोत्यासारखी होती. मोकळे पोते साखरेने भरले की त्याची किंमतही वधारते. काँग्रेसवाले मोकळय़ाच पोत्याची किंमत सांगतात, पण त्यात काय घातले आहे हेही महत्त्वाचे असते. असा युक्तिवाद या वेळी दानवे यांनी केला. प्रमोद महाजन व बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली भाजप-शिवसेनेची युती कायम राहावी अशी अपेक्षा आहे. मात्र, भाजपने स्वबळावर गतखेपेपेक्षा मोठा विजय संपादन करण्याची तयारी केली आहे. आपण महिनाभरापासून राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय दौऱ्यावर आहोत. त्यात ४८ पैकी ४१ मतदारसंघांचा आढावा आपण कार्यकर्ते व जनतेकडून घेतला असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.

देशात व राज्यात वेगवेगळय़ा घडामोडी होत आहेत. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव युती झाली आहे. पण, अशा युतींचा भाजपवर परिणाम होणार नाही. युतीचा असाचा प्रयोग १९९३ मध्येही झाला होता. पण, तेथे भाजपच्या जागा व मतांची टक्केवारीही वाढली होती. लोकसभेच्या निवडणुकीला विकासाचा मुद्दा घेऊन सामोरे जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. एकीकडे स्वबळाची तयारी आणि दुसरीकडे मित्रपक्षांसोबत युतीची अपेक्षा याबाबत बोलताना ते म्हणाले, की समविचारी सर्वानी भाजपसोबत एकत्र यावे, आमच्यातील स्वतंत्र लढण्याचा काँग्रेसला फायदा होऊ नये ही आमची भूमिका आहे. मित्रपक्षांशी युती होईल असा विश्वास असून, आम्ही सर्व जागांवर केलेल्या तयारीची मदत युतीनंतर मित्रपक्षांनाही होणारच आहे की असे दानवे यांनी स्पष्ट केले. सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी कसलीही चर्चा झालेली नाही, असेही स्पष्ट करताना कराडनजीकच्या मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचाच नगराध्यक्ष निवडून येईल. येथेही मोठा विजय मिळेल असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.