दसरा मेळाव्याचे भाषण करण्या ऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिमग्याचे भाषण केले. राज्यातील मुख्य प्रश्नावर न बोलता केवळ भाजप हाच टीकेचा मुद्दा घेऊन ते शिव्याशाप देण्याची भाषा करत होते अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला.

कोल्हापूरमधे पत्रकार परिषदेत बोलताना पाटील त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले भाजपाची भूमिका ठरलेली आहे. आम्ही कोणावर निशाणा साधणार नाही पण आमच्यावर कोणी टीका केली तर सोडणार नाही. हिंदुत्ववादी कोण आहे आणि तसे असल्याचे ढोंग कोण करतं आहे हे जनतेला समजतं आहे. आगामी निवडणुकीत ते जनता दाखवून देईल. मुख्यमंत्री व ठाकरे यांची भाषा काय दर्जाची होती याचा त्यांनी विचार केला पाहिजे. या मेळाव्यात जनतेच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा त्यांचा रोख भाजपवर टीका करण्याचा होता. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा राखली नाही. तिथे अन्य मुख्यमंत्री पदाचा सन्मान कसा राखतील, अशा शब्दात आमदार पाटील यांनी नारायण राणे यांच्या भूमिकेची पाठराखण केली.

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत प्रत्येकाला आपल्या उमेदवारीचे घोडं दामटता येईल. पण उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे पाटील म्हणाले.