News Flash

“महाराष्ट्रात लस पुरेशी नसताना तिसरी लाट थोपवण्यासाठी…”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका!

राज्यात करोनाची तिसरी लाट येऊच नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

संग्रहित छायाचित्र

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं असताना आता करोनाची तिसरी लाट देखील येणार असल्याचे सूतोवाच केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी दिले आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय यंत्रणेला तयार राहणं आवश्यक झालं आहे. त्यातच देशात उपलब्ध असलेले लसीचे डोस अपुरे असल्यामुळे करोनाचं संकट अधिकच गडद वाटू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या तिसऱ्या लाटेमधून सावरायचं असल्यास कठोर निर्बंध लागू करून त्यांची स्थानिक पातळीवर यशस्वी अंमलबजावणी केली जाणं आवश्यक असल्याची भूमिका देखील राघवन यांनी मांडली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे, याविषयी आपली भूमिका मांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते.

लसीकरणामुळे लाटेचा वेग मंदावेल!

लसीकरणाचं महत्त्व यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. “लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा वेग मंदावता येईल. त्यामुळे लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. १८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी लोकसंख्या राज्यात आहे. त्यासाठी आपल्याला १२ कोटी डोस लागणार आहेत. एक रकमी हे सर्व डोस खरेदी करण्याची तसेच दिवसाला १० लाख लोकांना लस देण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे. त्यासाठी लस उत्पादकांसोबत चर्चा सुरू आहे. पण, लस पुरेशी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्यविषयक सुविधा वाढवूनच तयारी करावी लागेल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपण कशी रोखू शकतो करोनाची तिसरी लाट? केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सागितला मार्ग!

ऑक्सिजन पुरवठा ही मोठी समस्या!

गेले वर्षभर करोनाशी आपण लढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अनेक सुविधा आपण उभ्या केल्या आहेत. राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल. पण सध्या महत्वाची गरज आहे ती ऑक्सिजनची. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी महत्वाची आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. ही चांगली बाब आहे. राज्यात सध्या मिशन ऑक्सिजन राबविण्यात येत आहे. जिल्ह्याची गरज ओळखून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवावा. करोना नियंत्रणात आला तरी गाफिल राहू नका. हा विषाणू घातक आहे. सध्याच्या म्युटेशनचा विषाणू हा जलदगतीने पसरत आहे. त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे. माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोविडवर मात करता येणार आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 9:13 pm

Web Title: cm uddhav thackeray on third wave of corona in maharashtra oxygen supply pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 वर्धा : करोना बळीच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाचा भार कुटुंबावरच सोपविण्याचा निर्णय!
2 ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या १० रुग्णालयांसाठी खासदार कुमार केतकरांनी दिला अडीच कोटींचा निधी!
3 शरद पवारांनी पाठवलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले..
Just Now!
X