शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केलं. त्यातल्या व्यंगचित्रांनी इतिहास घडवला. ही आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली. बाळासाहेब ठाकरेंना मार्मिककार म्हटलं जाई..ते शिवसेनाप्रमुख कसे झाले त्याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली. मार्मिक या साप्ताहिकाचा हिरक महोत्सव मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची ही आठवण सांगितली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“मार्मिकला खूप चांगला प्रतिसाद त्यावेळी मिळत होता. अनेक लोक घरी यायचे. तेव्हा माझे आजोबा (प्रबोधनकार ठाकरे) यांनी माझ्या वडिलांना (बाळासाहेब ठाकरे) विचारलं की अरे इतकी माणसं घरी येत आहेत. पक्ष किंवा काही संघटना काढणार की नाही? त्याव बाळासाहेब म्हणाले की हो विचार आहे. त्यानंतर आजोबांनी लगेच विचारलं संघटनेचं, पक्षाचं नाव काय ठरवलं आहेस? यावर बाळासाहेब काही बोलणार त्याच्या आतच आजोबा म्हणाले शिवसेना हे नाव दे. अशा रितीने मार्मिकमुळे शिवसेनेचा जन्म झाला.. आणि इतके दिवस मार्मिककार अशी ओळख असणारे बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुख झाले ” अशी आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली.

“सामर्थ्य कशात असतं? सामर्थ्य तलवारी, तोफगोळे, बंदुका, तलवारी या सगळ्यांमध्ये असतं. पण शिवसेनाप्रमुखांनी जे सामर्थ्य दाखवलं ते कुंचल्याच्या फटकाऱ्याचं सामर्थ्य दाखवलं. आपण जो विचार करतो ते कागदावर उतरवण्याची ताकद त्या कुंचल्यात असते. सुरुवातीला मार्मिकची स्थापना केली त्याचं कारण अन्यायाविरोधातला लढा हीच होती. तसंच त्या काळी अशा प्रकारचं साप्ताहिक काढणं ही काळाची गरज होती. मार्मिक सुरु झालं, तो प्रवास सुरु झालेला असताना बाळासाहेबांना हे जाणवलं की मराठी माणसाने रक्त सांडून जी मुंबई मिळवली तिथे परप्रांतीय हे हैदोस घालत आहेत. अशावेळी शिवसेनाप्रमुख गप्प बसणं शक्यच नव्हतं. माझे आजोबा तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. अशा घरातलं हे साप्ताहिक मराठी माणसावरचा अन्याय शांतपणे कसा बघत बसेल? त्यामुळे मार्मिकमधून मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायलाला वाचा फोडण्यासही सुरुवात झाली. शिवसेनाप्रमुखांनी जो कुंचला उचलला तो मराठी माणसाचं अस्त्र झाला.. असा या मार्मिकचा इतिहास आहे” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.