काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्यालय, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कचेरीत पक्षाच्या दारुण पराभवाची शोककळा पसरलेली असतानाच, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र नांदेडसह हिंगोलीत ‘आनंदा’ची धून सादर केली. चव्हाण यांनी नांदेडात देदीप्यमान विजय मिळवताना अॅड. राजीव सातव (हिंगोली) यांच्या विजयाला ‘हात’भार लावला. या दोघांनीच मराठवाडय़ात व राज्यात पक्षाची लाच राखली.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर चव्हाण आपल्या निवासस्थानीच बसून होते. आठव्या फेरीअखेर त्यांचे मताधिक्य ४० हजारांवर जाताच त्यांचे निवासस्थान व बाहेर समर्थकांची गर्दी वाढू लागली. कार्यकर्त्यांचा विजयोत्सव सुरू झाला. काहींनी गुलाल उधळला, काहींनी फटाके फोडून आनंद साजरा केला. पालकमंत्री डी. पी. सावंत, विवेक लोखंडे चव्हाणांच्या निवासस्थानी बसून होते. मतमोजणी केंद्र, तसेच अन्य माध्यमांतून येणाऱ्या माहितीचे संकलन लोखंडे करीत होते. दुपारी दीडच्या सुमारास खासदार भास्करराव खतगावकर, आमदार वसंतराव चव्हाण व अमर राजूरकर यांचे आगमन झाले. आमदार ओमप्रकाश पोकर्णा, हणमंतराव बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर हेही हजर होते.
विजय आवाक्यात आल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. कोणी पुष्पहार आणले तर कोणी ‘बुके’. विजय अधिकृत जाहीर होईपर्यंत चव्हाण यांनी एकही हार-गुच्छ स्वीकारला नाही. घराबाहेर गर्दी वाढत असताना चव्हाण व अन्य नेते नंतर आयटीएमच्या कार्यालयात जाऊन थांबले. राज्यासह देशात पक्षाला मोठे अपयश आल्याने व्यथित झालो. अशा वातावरणात नांदेडच्या मतदारांनी दिलेली साथ खूप महत्त्वाची व मोलाची असल्याचे चव्हाण यांनी अनौपचारिकपणे सांगितले.
दुपारच्या सत्रात हिंगोलीत सातव पिछाडीवर होते, परंतु सायंकाळी शेवटच्या फेऱ्यांमध्ये पिछाडी भरून काढत सातव यांनी निसटता विजय प्राप्त केल्याची माहिती आली. हिंगोली मतदारसंघात नांदेडचे दोन विधानसभा मतदारसंघ असून, सातव यांच्या प्रचारार्थ चव्हाण यांनी दोन सभा घेतल्या. चव्हाणांसह सातवही निवडून आल्याने १९९८नंतर पहिल्यांदा दोन (जोड) मतदारसंघांत काँग्रेसचे दोन खासदार लाभले आहेत.
गेल्या जानेवारीत येथे काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्यात एकीकडे चव्हाण यांच्या उमेदवारीचे सुतोवाच झाले, तर दुसरीकडे हिंगोली मतदारसंघ राष्ट्रवादीकडून घ्यावा व काँग्रेसने तेथे उमेदवार द्यावा, अशी मागणी किनवट-माहूरच्या प्रतिनिधींनी केली होती. सातव यांना राष्ट्रवादीतील एका गटाने विरोध केला, तरी शेवटी त्यांची सरशी झाल्याचे सांगून आमदार अमर राजूरकर यांनी आनंद व्यक्त केला.