22 September 2020

News Flash

Coronavirus: अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना वैद्यकीय प्रशिक्षण; ठाकरे सरकारकडून सर्व तयारी सुरु

करोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर तयारी केली जात आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

करोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर तयारी केली जात आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तुटवडा भासू नये यासाठी आशा, अंगणावडी सेविका, होमगार्ड्स यांना वैद्यकीय प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधत संचारबंदी जाहीर केली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री, उद्योगमंत्री यावेळी उपस्थित होते. मुख्य सचिवदेखील होते. संपूर्ण राज्याचा आढावा घेतला. जर वैद्यकीय क्षेत्रात अधिक स्टाफची गरज लागली तर आशा, अंगणावडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षण देण्याचा विचार आहे. काही ठिकाणी याची सुरुवात देखील करण्यात आली आहे”.

“करोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे. मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण करोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. एक लक्षात घ्या…कालचा दिवस होता त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे. सर्वांनी जनता कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे करोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होते. काल राज्यात १४४ जमावबंदी कलम लावले होते. पण आता मला राज्यात संचारबंदी लावावी लागते आहे. आज सकाळी काही ठिकाणी काही लोक फिरायला बाहेर पडत असल्याची माहिती मिळाली. नाइलाज म्हणून संचारबंदी लागू करत आहोत. चार किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र जमता कामा नये,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

“आपण राज्याच्या सीमा सील केल्या होत्या. पण आज आपण आंतरजिल्हा सीमादेखील सील करत आहोत. काही जिल्हे, ठिकाणे येथे हा विषाणू पोहोचलेला नाही. त्या जागा सुरक्षित ठेवायच्या आहे. आणि जिथे पोहोचला आहे तिथेच त्याला संपवायचं आहे. देशांतर्गत विमानतळ तात्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

काय बंद ? काय सुरु ?

“जीवनावश्यक वस्तू, औषधे, औषधे निर्मिती करणार कारखाने, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. बेकरी सुरु असतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील. घाबरण्याचं काही कारण नाही,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

“सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद राहतील. प्रार्थनास्थळांमधील धर्मगुरुंना फक्त आत जाऊन प्रार्थना, पूजा करण्याची परवानगी असेल. गर्दी नाही म्हणजे नाही. शहरातही बस अत्यावश्यक सेवेसाटी वापरली जात आहे. लोकल बंद केल्या आहेत. खासगी वाहनं अत्यंत गरज असेल तरच बाहेर पडतील. अन्यथा बाहेर पडणार नाही. टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन आणि रिक्षामध्ये चालक अधिक एक अशी मर्यादित संख्या असेल. तीदेखील अत्यंत महत्त्वाची असेल तरच परवानगी दिली जाणार आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 6:24 pm

Web Title: coronavirus shivsena cm uddhav thackeray medical education to home guards anganwadi sevika sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 तुमच्या मनात विचार येत असेल, आला बाबा हा पुन्हा एकदा… -उद्धव ठाकरे
2 Coronavirus: संचारबंदी जाहीर, सीमा बंद; उद्धव ठाकरेंनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणांची यादी
3 CoronaVirus : बेघर-भिक्षेकरांच्या मदतीला धावून आले विठ्ठल-रखुमाई; मंदिर समितीचा स्तुत्य निर्णय
Just Now!
X