गणेशोत्सवासाठी कोकणात येत असलेल्या चाकरमान्यांच्या खासगी वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी आणि रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण येथील तपासणी नाक्यांच्या टापूत तर दिवसभर काही किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्याचे दृश्य होते.

बाहेरच्या जिल्ह्यांतील प्रवाशांमुळे कोकणात करोना महामारीचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या चाकरमानींनी उत्सवापूर्वी १४ दिवस गावातील शाळा किंवा अन्य ठिकाणी अलगीकरणात राहावे, अशी सूचना बहुतेक ग्रामपंचायतींनी केली आहे. यंदा २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असल्याने अलगीकरणाचा कालावधी हिशेबात धरता कमाल ७ ऑगस्टपर्यंत या चाकरमानींनी गावी पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसात होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेकजण शनिवारपासूनच खासगी वाहनांनी गावांकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत या रांगा लागल्या होत्या.

कशेडी बंगला येथील तपासणी नाक्यावर वाहने थांबवून प्रवाशांची कागदपत्रे तपासण्याची मोहीम सुरू झाली. शनिवारी दिवसा व रात्री मोठया प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होऊन भोगाव-येलंगेवाडी दत्तवाडीपर्यंत तब्बल चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सीमेवरील खारेपाटण येथेही असेच चित्र होते. त्यातच पावसाच्या अधूनमधून सरी पडत असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय करोनामुळे परिसरात एकही हॉटेल किंवा ढाबा उघडा नसल्यानेही चाकरमान्यांना चहापाणी मिळणेही मुश्किल झाले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण, करूळ आणि फोंडा येथे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने करोना रॅपिड तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे वाहने थांबवून ठेवली जात आहेत. पण या केंद्रामुळे चाकरमानींकडून संसर्ग रोखण्यासाठी मदत होणार आहे. याबाबत माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले की, “बाहेरगावाहून आलेल्या चाकरमानींचा ताप आणि रक्तातील प्राणवायूची पातळी या दोन प्राथमिक तपासण्या या तिन्ही ठिकाणी केलेल्या जात आहेत. तशी लक्षणे आढळली तर पुढील चाचण्या केल्या जातात आणि संबंधितांच्या गावी कळवून त्यांना विलगीकरणात ठेवण्याची सूचना केली जात आहे. तिन्ही ठिकाणी मिळून दिवसभरात सुमारे १५० प्रवाशांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत”.