News Flash

यवतमाळ जिल्ह्य़ात यंदा वाईट स्थिती राहणार असल्याचा अंदाज

जिल्ह्य़ात एकूण ९ लाख १० हजार ४६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे.

कापसावर शेंद्री अळीचा प्रादुर्भाव, उत्पादन घटणार

सर्वाधिक कापूस पिकविणारा जिल्हा असूनही सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांसाठी कुख्यात असलेल्या या जिल्ह्य़ात गेल्या तीन वर्षांंपासून नापिकीमुळे शेतक-यांचे नशीब यंदा बदलेल, अशी आशा होती. कधी नव्हे एवढा चांगला पाऊस जूनच्या मध्यापासून तर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत झाल्याने ही आशा पल्लवीत झाली होती. जिल्ह्य़ात कापूस आणि सोयाबीन ही दोनच मुख्य पिके आहेत, पण गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपली असून हलक्या जमिनीतील सोयाबीन तर हातचे गेले आहे.

जिल्ह्य़ात एकूण ९ लाख १० हजार ४६ हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली आहे. त्यात कापूस ४ लाख २० हजार ७६८ हेक्टर, सोयाबीन २ लाख ५३ हजार ३०५, तूर १ लाख ७३ हजार, ज्वारी ५१ हजार २००, उडीद ८ हजार १००, मूग ८ हजार ३४०, तर ११ हजार हेक्टरवर मका, बाजरी व इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. ९९ टक्के बिटी कॉटनचाच पेरा असून यंदा या पिकावरही शेंद्री अळीचा हल्ला झाला असल्याने पिके धोक्यात येऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हलक्या जमिनीतील ५५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पावसाअभावी पूर्णत हातचे गेले आहे. थोडेसे नशीब बलवत्तर म्हणून की काय मंगळवारी जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने बऱ्यापकी हजेरी लावल्याने भारी जमिनीतील सोयाबीन आणि कापसाला थोडा आधार मिळाला आहे. तरीही प्रत्यक्ष घरात पीक येईपर्यंत कोणताही अंदाज व्यक्त करता येणार नाही, असे कृषी विभागाने म्हटले आहे. सध्या उडीद, मूग शेतकऱ्याच्या घरात आले असले तरी बाजारपेठेत भाव मात्र अतिशय कमी आहे. उडीद ५५०० रुपये िक्वंटल, मूग ४००० रुपये, सोयाबीन ३२००, तूर ६००० रुपये, असा बाजारभाव आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्याच्या घरातील कापूस विकल्यावर बाजारात कापसाला ६ हजारापर्यंतचा भाव होता. त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी अन् व्यापारांनाच जास्त झाला.

आर्णी येथील शेतकरी शंकर रेवा राठोड यांनी सांगितले की, आमचे सारे कुटुंब रात्रंदिवसा शेतात राबते. यंदा सुरुवातीला चांगल्या पावसाने मागील तीन वर्षांचा बॅकलॉग भरून निघेल, असे वाटत असताना मारलेली दडी, पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव, विम्याची रक्कम मिळणार नसल्याची खात्री, यामुळे मागच्या परिस्थितीपेक्षाही अतिशय वाईट दिवस शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहेत.

बी-बियाणे आणि रासायनिक खते मुबलक प्रमाणावर उपलब्ध होऊनही त्याचा प्रत्यक्षात काहीही लाभ पदरात पडताना दिसत नाही. मागील दोन वर्षांच्या दुष्काळामुळे घेतलेले कर्ज शेतकऱ्यांना फेडता आलेले नाही, अशा २४ हजार १४१ थकबाकीदारांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. मात्र, पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला तरी अद्याप पुनर्गठीत कर्जाची ६३ कोटींची रक्कम अद्यापही हाती मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. याशिवाय, यंदा जिल्हा बँकेला ४२६ कोटींचे नियमित पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत ३४० कोटी म्हणजे, ८० टक्के पिककर्जाचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळावे, यासाठी ‘अर्ज द्या कर्ज घ्या’, ही योजना कार्यान्वित केली होती. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्य़ात अर्ज केलेल्या १६ हजारांपैकी केवळ ३ हजार शेतकऱ्यांनाच राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जाचे वाटप केले.

फक्त सार्वजनिक वित्ताची उधळपट्टी -माणिकराव ठाकरे

जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी शासनाने या जिल्ह्य़ाची पथदर्शी जिल्हा म्हणून निवड केली. बळीराजा चेतना अभियान नावाचे अभियान सुरू करून ३२ कोटी रुपये मंजूर केले. एवढा पसा कसा खर्च करावा, हेच न समजल्याने सार्वजनिक वित्ताची उधळपट्टी होत असून शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असा आरोप प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2016 1:04 am

Web Title: cotton farming in difficult condition at yavatmal district
Next Stories
1 चांगला पाऊस व रोगराईअभावी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्य़ात उत्पन्नवाढीची शक्यता
2 पश्चिम वऱ्हाडात परतीच्या पावसाने साथ न दिल्यास पिकांवर दुष्परिणाम
3 मुंबईसह राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा
Just Now!
X