करोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलिगी मरकज या धार्मिक कार्यक्रमात हजेरी लावून नवी मुंबईत परतलेल्या आणि पोलिसांना याबाबत माहिती न देणाऱ्या १० परदेशी नागरिकांवर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मरकजच्या कार्यक्रमातून परतल्यानंतर पोलिसांपासून माहिती दडवून नवी मुंबईत राहणाऱ्या फिलिपाईन्स १० नागरिकांवर पारपत्र कायदा व संसर्गजन्य रोग प्रतिबंधित कायद्यांतर्गत रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका आरोपीचा यापूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

फिलिपाईन्सचे हे नागरिक १० ते १६ मार्च दरम्यान नवी मुंबईत दाखल झाले होते. येथे ते वाशी येथील नूरल इस्लाम ट्रस्ट येथे राहत होते. त्यातील ३ जणांना कोव्हिडं १९ अर्थात कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे इतर ७ जणांना अलगिकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. या परदेशी नागरिकांमुळेच वाशी येथील तिघेजण कोरोनाबाधित झाल्याचा दावा नवी मुंबई महानगरपालिकेनं केला आहे.

भारतात वैध प्रवेश करताना पारपत्र नियमांचे मात्र त्यांनी उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. या परदेशी नागरिकांनी नियमांचे पालन न केल्याने इतरांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप करीत त्यांच्यावर पारपत्र कायदा व संसर्गजन्य रोग प्रतिबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक शिखरे करीत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.