कायद्यानुसार उस गाळप झाल्यानंतर १४ दिवसात ‘एफआरपी’नुसार देयके अदा केली नाहीत म्हणून शुक्रवारी ‘सोनहिरा’ आणि ‘केन अ‍ॅग्रो’ या साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाविरूध्द न्यायालयात फौजदारी दाखल करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकत्रे संदीप राजोबा यांनी या फिर्यादी दाखल केल्या आहेत.
कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे बिल गाळपानंतर १४ दिवसात एफआरपीनुसार संबंधित शेतकऱ्याच्या नावे बँक खात्याला वर्ग करणे बंधनकारक असताना सोनहिरा व केन अ‍ॅग्रो या साखर कारखान्यांनी कायद्याचे पालन केलेले नाही. यामुळे त्यांच्यावर फौजदारी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजोबा यांनी कडेगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.
राजोबा यांच्यावतीने शहर सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी ही याचिका गुरूवारी न्यायालयात दाखल केली असून यावर उद्या विचार करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील गाळप सुरू असलेल्या सर्वच कारखान्याविरूध्द अशा याचिका न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे राजोबा यांनी सांगितले.