रायगड जिल्ह्यत कृष्णजन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. दहिहंडी उत्सवाच्या पाश्र्वभुमीवर जिल्ह्यत अनेक भागात श्रावणसरीने हजेरी लावल्याने गोविंदाचा उत्साह व्दिगुणित झाला.

सोमवारी रात्री जन्माष्टमी सोहळा सर्वत्र पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक वातावरणात पार पडला. कथा, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आले होते. जन्माष्टमीचे औचित्य साधून अलिबाग तालुक्यामध्ये काही गावांमध्ये सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. अलिबागेत बालाजी मंदिर, राधा-कृष्ण मंदिर तसेच भाल नाका आदी ठिकाणी जन्माष्टमी सोहळा पार पडला.

मंगळवारी सकाळपासून गोविंदांचे जथ्थेच्या जथ्थे गावागावात फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘तुझ्या घरात नाही पाणी घागर, रिकामी रे गोपाळा’ म्हणत ढोल-ताशांच्या तालावर गोविंदा नाचत होते. घरोघरी जाऊन साखळी पद्धतीने नाचून अंगावर पाणी घेत होते. दही पोह्याचा नवेद्य खाऊन पुन्हा दुसऱ्या घरी पाणी घेण्यासाठी जात असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत होते.

मच गया शोर सारी नगरी रे.., गोविंदा आला रे आला.., ढाकुमाकूम..ढाकुमाकूमसारख्या िहदी -मराठी गाण्यांवर नाचणारे गोविंदा लाल, पिवळ्या, पोपटी रंगाचे टी शर्ट घालून कपाळाला गोविंदांची पट्टी बांधून दहीहंडी फोडण्यासाठी शहरात आणि परिसरात मोठय़ा संख्येने फिरत असल्याचे पाहायला मिळत होते. गल्लीतील आणि नाक्यावरच्या छोटय़ा-मोठय़ा दहीहंडय़ा फोडून गोंविदांनी आनंद व्यक्त केला.

रायगड जिल्ह्य़ात यावर्षी ७ हजार ३३७ दहीहंडय़ा बांधण्यात आल्या होत्या. त्यामध्ये २ हजार १६० सार्वजनिक, तर ५ हजार १७७ खासगी दहीहंडय़ांचा समावेश होता. पनवेल, खोपोली आणि कर्जत येथे लाख मोलाच्या दहीहंडय़ांचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग शहरात जोगळेकर नाका, चेंढरे, मेटपाडा, रामनाथ, मारूती नाका आदी ठिकाणी दहीहंडय़ा बांधण्यात आल्या होत्या. कोळीवाडय़ातून गोविंदोत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली होती.  दरम्यान गोविंदात्सवात कायदा- सुव्यवस्था अबाधित राखली जावी. म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तु-तू म-मच्या किरकोळ घटना वगळता गोविंदोत्सव उत्साहात साजरा झाला.

रायगड जिल्हा साऊंड व लाईट असोसिएशनचा शांतता दिन

साऊंड सिस्टीम व इतर वाद्यवृंदांना कार्यक्रमाच्या ठिकाणी ७० डेसिबल इतकी आवाजाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. या मर्यादेमुळे साऊंड सिस्टीमचा वापर करणेच लोक बंद करतील. यामुळे डिजेवादकांवर उपासमारीची वेळ येईल. अशी भिती व्यक्त केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा साऊंड व लाईट असोसिएशनने आज शांतता दिन पाळला. मोठय़ा डिजेंचा दणदणाट झाला नाही.

महाडमध्ये दहिहंडी उत्साहात       

महाड शहरासह तालुक्याच्या ग्रामिण भागात दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला.आ .भरत  गोगावले मित्र मंडळ व शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने उंच हंडय़ा फोडण्याच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील व शहरातील अनेक गोविंदा पथकांनी सहा पेक्षा अधिक थर लावले. चांभारिखड येथील जय भवानी मंडळाच्या महिलांच्या गोविंदा पथकाने देखील पाच थरांचा मनोरा रचला .

कुंभार आळी, सरे कर आळी , काकरतळे, तांबड भुवन, तांबट आळी , गवळ आळी, कोटेश्वरी तळे,  नवे नगर आदी ठिकाणी यानिमित खालुबाजावर गोविंदा पथकांच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरिक्षक रिवद्र िशदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.