अशोक तुपे, श्रीरामपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी अर्थसंकल्पात सुमारे २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही कामासाठी निविदा मागविण्यात आलेली नसल्याने या कामाला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने सन २०२१-२२ पर्यंत दौंड-मनमाड रेल्वे मार्ग दुहेरी करण्यास मंजुरी दिली. २४७ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी २ हजार ३३० कोटी रुपये खर्च येणार आहे. चालू वर्षी अर्थसंकल्पात सुमारे २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत रेल्वेने दुहेरीकरणाच्या कामासाठी निविदा मागवल्या नाहीत. त्यामुळे चालू वर्षीचा निधी खर्च होण्याची शक्यता नाही. २०१५ मध्ये दुहेरीकरणाच्या कामाच्या सर्वेक्षणासाठी सुमारे ९ कोटी ३७ लाख रुपये खर्च केला होता. सर्वेक्षण झालेले असून निविदा मागवल्यानंतर कामास लवकरच सुरुवात होणार आहे.

उत्तर भारत व दक्षिण भारताला जोडणारा हा रेल्वेमार्ग असून तो एकेरी असल्याने रेल्वे वाहतूक अतिशय संथगतीने होते. १८६८ व १८७६ मध्ये या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. फेब्रुवारी १८७७ मध्ये या रेल्वेमार्गाच्या मातीच्या भरावास प्रारंभ झाला. १८७८ मध्ये हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला. १७ एप्रिल १८७८ मध्ये पहिली रेल्वे या मार्गावरून धावली. रेल्वेमार्गावर ६९ लहान-मोठे पूल आहेत. भीमा, गोदावरी, प्रवरा व मुळा या चार नद्यांवर मोठे पूल आहेत. भीमा नदीवरील पूल सर्वात मोठा आहे. हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी १ कोटी ३५ लाख रुपये खर्च आला होता. ब्रिटिशांनी या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करताना भविष्यातील दुहेरीकरणाचा विचार करून भूसंपादन केले होते. भूसंपादनावर मोठा खर्चही सरकारने केला होता. दुष्काळामध्ये या रेल्वेमार्गाचे काम झाले.

दौंड-मनमाड रेल्वेमार्ग हा एकेरी असल्याने अनेक वेळा रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागते. अनेकदा मेगाब्लॉक घ्यावा लागतो. गेल्या एक वर्षभरापासून या रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे पॅसेंजर गाडय़ा अनेक दिवसांपासून बंद आहेत. तसेच नवीन गाडय़ा सुरू करता येत नाही. या मार्गावर कांदा, भाजीपाला, फळे, सिमेंट, दूध व धान्य तसेच पोलादाची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर होते. भारतीय सैन्य दलाचे नगर येथे ठाणे असून, त्यासाठीही रेल्वेचा वापर होतो. नगर येथे वाहनतपासणी केंद्रही आहे. सुमारे ५० रेल्वेगाडय़ा या मार्गावरून धावतात. मात्र, एकेरी रेल्वेमार्ग असल्याने अनेक स्थानकांवर रेल्वे थांबवाव्या लागतात. शिर्डी ते पुणतांबा हा रेल्वेमार्ग गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. मात्र दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झालेले नसल्याने देशाच्या विविध भागात शिर्डीसाठी थेट गाडय़ा सुरू करता आलेल्या नाहीत. फारच मोजक्या साप्ताहिक गाडय़ा सुरू करता आलेल्या आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई येथे जादा गाडय़ा सुरू करता आलेल्या नाहीत.

दौंड-मनमाड रेल्वेमार्ग दुहेरी झाल्यास मनमाड ते पुणे हे अंतर साडेतीन ते चार तासांनी कमी होणार आहे. तसेच मनमाड-मुंबई या रेल्वेमार्गावरील ताण कमी करता येऊन काही रेल्वे पुणेमार्गे वळविता येणे शक्य होणार आहे. तसेच उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणाऱ्या काही रेल्वेगाडय़ा या मार्गाने वळविता येतील. शिर्डी, शनिशिंगणापूर, पंढरपूर, तिरुपती ही तीर्थक्षेत्रे एकमेकांना रेल्वेने जोडणे शक्य होणार आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल.

प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रवासी संघटना गेल्या २५ वर्षांपासून या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व्हावे, म्हणून लढा देत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामाला मंजुरी दिली. आर्थिक तरतूदही केली. मात्र, रेल्वेने निविदा काढण्याचे काम लांबणीवर टाकले. यापूर्वीही रेल्वेने विद्युतीकरणाचे काम मुदतीत पूर्ण केले नव्हते. आता त्याची पुनरावृत्ती होऊ  नये. रेल्वेमार्ग दुहेरी झाल्यानंतर मनमाड-पुणे, नगर-पुणे या मार्गावर इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करता येतील. रेल्वेचे काही अधिकारी या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

-रणजित श्रीगोड, अध्यक्ष, प्रवासी संघटना

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daund manmad double railway track work likely get delay
First published on: 26-09-2018 at 02:06 IST