देशाच्या प्रगतीमध्ये संविधानाचा वाटा मोठा असून आपली संस्कृतीच ‘वसुधव कुटुंबकम’ आहे. वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असून यातूनच देशाचा विकास घडू शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तासगाव येथे केले.

तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पूर्णाकृती शिल्प व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती शिल्प यांचे अनावरण व लोकार्पण सोहळा व सामाजिक अधिकारिता शिबिरांतर्गत दिव्यांगांना सहायक उपकरण वाटप कार्यक्रमप्रसंगी तो बोलत होते.

या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्यचे पालकमंत्री सुभाष देशमुख, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुमन पाटील, अनिल बाबर, सुरेश खाडे, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, सांगलीच्या महापौर संगीता खोत, तासगावचे नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, नितीन शिंदे आणि राजेंद्र देशमुख, महावितरणच्या संचालिका नीता केळकर, भाजपचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले,की आपण सर्व लोक भारतमातेची लेकरे आहोत. जात, धर्म, पंथ यांच्या नावावर भेद करू नये. आपली संस्कृतीच वसुधव कुटुंबकम आहे. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे एकाच वेळी लोकार्पण हा सोहळा आगळा वेगळा असल्याबद्दल अभिनंदन करून ते म्हणाले, की अरबी समुद्रात छत्रपती शिवराय व इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक कीर्तीची स्मारके उभारण्यात येत असल्याचे सांगून महामानवांच्या स्मारकांमधून जगण्याची प्रेरणा, ऊर्जा, स्फूर्ती मिळत असते.

या वेळी जिल्ह्यातील ६ हजार ६५६ दिव्यांगांना सहायक उपकरणे, नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना टॅब आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून ३५६ लाभार्थीना देण्यात येत असलेल्या धनादेशांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण केले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व खासदार संजय पाटील यांनी उपसा सिंचन योजना मोठय़ा प्रमाणावर व गतीने मार्गी लावल्या असून त्यातून या भागाचे चित्र निश्चितपणे बदलेल, असा विश्वास व्यक्त केला.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेती, पिण्याचे पाणी यांचा प्रश्न मिटला पाहिजे, यासाठी नदीजोड कार्यक्रम हाती घेतला होता. शासन या संकल्पनेला गती देत आहे.

समाजा-समाजातील तेढ संपवण्यासाठी भरीव कार्य होणे आवश्यक असल्याचे सांगून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी खासदार संजय पाटील करित असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन केले. सर्व माणसांच्या शरीरात एकाच रंगाचे रक्त असून, कोणताही भेदभाव असू नये, अशा भावना त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.

प्रास्ताविकात कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील म्हणाले, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून २०९२ कोटी रुपये व बळीराजा जलसंजीवनी योजनेतून १२०० कोटी रुपये केंद्र शासनाने दिल्याने उपसा सिंचन योजना मार्गी लागल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून साडे सात हजार कोटी रुपयांचे रस्ते, रेल्वेचे दुहेरीकरण, ड्राय पोर्ट आदी कामे मार्गी लागली असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांनी आभार मानले.