26 February 2021

News Flash

मुंडे बहीण-भावांच्या गळाभेटीनंतरही एकमेकांवर हल्लाबोल

धनंजय मुंडे यांनी महिला बालविकास विभागातील चिक्की खरेदी प्रकरणातून पंकजा यांना लक्ष्य केले.

पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर जाऊन धनंजय यांची गळाभेट घेऊन अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना  यावर्षीचा प्रभावी राजकारणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर जाऊन धनंजय यांची गळाभेट घेऊन अभिनंदन केले. गृहकलहानंतर कट्टर राजकीय विरोधक बनलेले मुंडे बहीण-भावाची सार्वजनिक कार्यक्रमातील पहिल्याच गळाभेटीने सर्वानाच सुखद धक्का बसला आणि समाजमाध्यमातून त्यांच्यातील ‘राजकीय वैरत्व’ कमी झाल्याचे अंदाज बांधले जात होते. मात्र दोघांनीही राजकीय कुरुक्षेत्रावर दुसऱ्याच दिवसांपासून परस्परांवर ‘हल्लाबोल’ करत राजकीय लढाई कायम असल्याचे स्पष्ट केल्याने अनेकांचा हिरमोड झाला.

बीड जिल्ह्यच्या राजकारणात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी गृहकलहानंतर राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारल्याने मुंडे कुटुंबातील राजकीय संघर्ष टोकाला गेला. मुंडे यांच्या निधनानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्यात स्थानिक पातळीवर संघर्ष अधिक तीव्र झाला. मात्र चार वर्षांपूर्वी भाजप सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळाली. कट्टर राजकीय विरोधक बनलेल्या मुंडे बहीण-भावाला एकाचवेळी राज्यस्तरावर नेतृत्वाची संधी मिळाल्याने दोघातील संघर्ष विधिमंडळात टोकदार झाला. धनंजय मुंडे यांनी महिला बालविकास विभागातील चिक्की खरेदी प्रकरणातून पंकजा यांना लक्ष्य केले. तर नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांच्या कथित सीडी प्रकरणानेही गदारोळ उठला. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर दोघातील राजकीय वैरत्व दिवसेंदिवस वाढल्याचेच दिसत राहिले. दोघांचेही समर्थक समाजमाध्यमातून आक्रमकपणे एकमेकांना बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. धनंजय यांचे वडील पंडितराव मुंडे यांच्या निधनानंतर पहिल्यांदा पंकजा व धनंजय एकत्र आले. त्यानंतर दोन दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावर्षीचा प्रभावी राजकारणी पुरस्कार धनंजय मुंडे यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर जाऊन गळाभेट घेऊन धनंजय यांचे अभिनंदन केले. कट्टर राजकीय विरोधक असलेले मुंडे बहीण-भाऊ यांची गळाभेट महाराष्ट्रासाठी सुखद धक्का होती. या गळाभेटीची बीड जिल्ह्यत मोठय़ा प्रमाणावर चर्चा सुरू झाली. समाजमाध्यमातून दोघांच्या समर्थकांनी अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करत दोघातील राजकीय वैरत्व कमी झाल्याचा कयास बांधत समाधान व्यक्त केले. मात्र धनंजय मुंडे यांनी पुणे येथील हल्लाबोल सभेत थेट भाजप सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करताना चिक्कीत बहीण पंकजा यांनी पैसे खाल्ल्याचा घणाघात केला. तर तिकडे बीड जिल्ह्यत पंकजा यांनीही जिल्ह्यतील राष्ट्रवादीचे नेते कठपुतली असून त्यांचे दोर बारामतीकडे आहेत. राष्ट्रवादीने केवळ राजकीय भूक वाढवून आपला फायदा करून घेतला. आता जनतेच्या साथीवर परळीत विरोधकांना आगामी निवडणुकीत चितपट करून जिल्ह्यत लोकसभेसह विधानसभेच्या सहाही जागांवर विजय मिळवू, असा दावा करत थेट नाव न घेता धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष टीकेची झोड उठवली. गळाभेटीनंतर समाजमाध्यमातून सुरू असलेल्या प्रतिक्रियांच्या गदारोळात मुंडे बहीण-भावानी राजकीय मदानात एकमेकांवरील हल्लाबोल कायम ठेवल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 4:22 am

Web Title: dhananjay munde slams pankaja munde after sharing stage in an award function
Next Stories
1 नीरव मोदीच्या खंडाळय़ातील जमिनीवर पुन्हा शेतकरी आंदोलन
2 वैद्यकीय प्रवेशातील गोंधळाबाबत विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात
3 वारेमाप उत्पादनाने साखरेचे भाव गडगडले!
Just Now!
X