मराठा आरक्षणासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलनाने वेग घेतला आहे. बीड, परळीसह राज्यभरात अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू असून या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी परळीत ३० तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते हटायला तयार नाहीत. आंदोलनाचा वणवा पेटण्याआधी सरकारने आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंडे यांनी आंदोलकांची बाजू घेत आंदोलनाचा वणवा पेटण्याआधीच सरकारने आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर सरकार लवकरच ७० हजार जागांची भरती करणार आहे. आरक्षण नसेल तर या जागांच्या भरतीमध्ये आम्हाला स्थान मिळणार नाही अशी भीती मराठा समाजातील तरुणांमध्ये पसरली आहे. त्यामुळे आरक्षण दिल्याशिवाय ही भरती होणार नाही किंवा या भरतीत १६ % आरक्षण कायम ठेवावे ही आंदोलनकर्त्यांची मागणी असल्याचे त्यांनी म्हटले.

भाजपा सरकारने कूटनीती तंत्राचा वापर करून गुजरातमधील पटेलांचे, हरियानातील जाटांचे आरक्षण संपवून टाकले# तोच प्रयोग मराठा आरक्षणाबाबत होत आहे. मागासवर्ग आयोगाचे काम कुठंपर्यंत आले असा सवाल करत किती दिवसात पूर्ण होणार आहे अशी विचारणा न्यायालयाला करावी लागत आहे याचा अर्थ सरकार वेळकाढुपणा करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, बीड, परळीसह राज्यातील विविध भागात मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आंदोलकांसमोर येऊन खुलासा करावा. मुख्यमंत्र्यांना जर खऱ्या अर्थाने आरक्षणाचा हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांनी माध्यम आणि आंदोलकांसमोर येऊन बोलावे, अशी आग्रही मागणी आंदोलक करत आहेत.