जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या विभागाचा तातडीने अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा अशा सूचना देत काम करायचे नसेल तर सुटीच घ्यावी लागेल असा इशारा जलसंपदा मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आढावा बठकीत दिला. राज्य शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी शेतकऱ्यांसाठी टंचाईवर मात करणाऱ्या जलसंधारण कामांसाठी खर्च व्हावा. तसेच, सन २०१६-१७ या आर्थिक वर्षांतील या योजनेंतर्गतची कामे पूर्ण करण्याचा कालावधी संपला आहे. राज्य शासनाने ही कामे करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. तरी अभियानाशी संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करून युद्ध पातळीवर ही कामे पूर्ण करावीत, असे आदेश जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.

जलयुक्त शिवार अभियांतर्गत गेल्या तीन वर्षांतील कामांच्या आढावा बठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जलसंधारण विभागाचे सहसचिव व्ही. एस. वखारे, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पुणे विभागीय उपायुक्त (रोहयो) अजित पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी करताना हलगर्जी करणाऱ्या संबंधित यंत्रणांवर जिल्हाधिकारी यांनी अहवाल सादर करावा. तसेच, कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांची अनामत रक्कम जप्त करावी, असेही आदेश देऊन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, सन २०१७-१८ साठी या अभियानांतर्गत प्रकल्प आराखडा तयार करताना संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावे टंचाईमुक्त होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी तहसीलदारांनी संबंधित विधानसभा सदस्य, लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, प्रलंबित कामे पूर्ण करणे हे एक आव्हान आहे. या कामांना संबंधित यंत्रणांनी गती द्यावी. कारण ही कामे झाली नाहीत तर ती गावे या अभियानापासून वंचित राहतील. यावेळी खासदार संजयकाका पाटील, उपस्थित सर्वआमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील कामांबाबत मौलिक सूचना केल्या.

जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी प्रास्ताविकात गेल्या ३ वर्षांत झालेल्या कामांची माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्षनिहाय सादरीकरण केले. यावेळी गोपीचंद पडळकर, अधीक्षक अभियंता सुनील कुशीरे, कार्यकारी अभियंता सी. एच. पाटोळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह जलयुक्त शिवार योजनेशी संबंधित सर्व यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.