सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली म्हणून २० कोटींचा विशेष निधी देणा-या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सासुरवाडी असणारा शिवालय बंगला तुंबलेल्या ड्रेनेजमध्ये गेल्या १५ दिवसापासून सापडला आहे. महापालिकेच्या कर्मचा-यांना अद्याप ड्रेनेजमधील अडथळाच दूर करता आला नसल्याने एका ज्येष्ठ नगरसेवकाच्या शाळेसह ८ ते १० हजार लोकांच्या आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
मिरजेतील पुजारी चौकात मध्य रस्त्यामध्ये ड्रेनेजचे चेंबर आहे. आजूबाजूला हॉस्पिटल, रमामाता झोपडपट्टी, उद्योगपती मराठे यांचे निवासस्थान आणि मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे यशवंत घोरपडे राहात असणारा शिवालय हा बंगला, नगरसेवक सुरेश आवटी यांची मूक-बधिर मुलांची शाळा या परिसरात आहे. ड्रेनेज तुंबल्याने या राहत्या घरातील सांडपाणी बाहेर वाहून जाणे बंद झाले आहे. याबाबत घोरपडे यांनी महापालिकेकडे दि. २४ ऑगस्ट रोजी रीतसर तक्रार अर्ज देऊनही अद्याप ड्रेनेजमधील अडथळा दूर करणे महापालिकेच्या कर्मचा-यांना शक्य झालेले नाही. चेंबर उघडल्याने मलामिश्रित सांडपाणी सांगली रस्त्यांवर वाहत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.