02 March 2021

News Flash

‘हॅकर हा शेवटी चोरच, सय्यद शुजावर विश्वास नाही’

गोपीनाथ मुंडे यांचा थेट जनतेशी संबंध होता, प्रत्येक मतदारसंघाची त्यांना अचूक माहिती होती. त्यामुळे त्यांना ईव्हीएमची कधीही चिंता वाटली नसेल, असे त्यांनी म्हटले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यामुळे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेतील हॅकर सय्यद शुजाने केला असतानाच या वृत्तावर आता प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हॅकर हा शेवटी चोरच असतो, त्यामुळे त्याच्यावर विश्वास नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले असून गेली साडेचार वर्षे हा हॅकर कुठे होता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

इंडियन जर्नालिस्ट्स युनियन (युरोप)ने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत सय्यद शुजा या हॅकरने सोमवारी ईव्हीएममध्ये हेराफेरी करता येऊ शकते, असा दावा केला होता. भारतातील २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांच्या (ईव्हीएम) साहाय्याने ‘घोटाळा’ करण्यात आला, असेही त्याने म्हटले होते. २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यामुळे केंद्रीय मंत्री राहिलेल्या महाराष्ट्रातील एका नेत्याला ठार मारण्यात आले, असा गौप्यस्फोट त्याने केला. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूसंदर्भात त्याने हे विधान केले होते. या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाची रॉ मार्फत चौकशी करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती.

या घडामोडी घडत असतानाच प्रकाश महाजन यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ‘गोपीनाथ मुंडे यांच्यावर श्रद्धा असणारे लाखो लोक आहे. शुजाच्या विधानांमध्ये किती तथ्य आहे, हा देखील प्रश्नच आहे’, असे प्रकाश महाजनांनी म्हटले आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा थेट जनतेशी संबंध होता, प्रत्येक मतदारसंघाची त्यांना अचूक माहिती होती. त्यामुळे त्यांना ईव्हीएमची कधीही चिंता वाटली नसेल, असे त्यांनी म्हटले आहे. गैरमार्गाने युद्ध जिंकणे ही गोपीनाथ मुंडे यांची विचारधारा नव्हती. त्यांचा मतदारांवर विश्वास होता. १९८५ मधील एका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा फार कमी मतांनी पराभव झाला होता. त्या काळी मतपत्रिका होती. पण मुंडे यांनी मतदानाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवला आणि मोठ्या मनाने स्वत:चा पराभव स्वीकारला होता, अशी आठवणही प्रकाश महाजन यांनी सांगितली.

गोपीनाथ मुंडे हे राजकारणातील शिखर गाठत असताना धनंजय मुंडे यांनीच त्यांच्यावर टीका केली होती. अशी टीका गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधकांनीही कधी केली नव्हती. आता तेच धनंजय मुंडे पुळका दाखवत आहेत. आता गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूवरुन राजकीय फायदा घेतला जात आहे, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 11:59 am

Web Title: evm hacking prakash mahajan reaction on syed shuja claim about gopinath munde death
Next Stories
1 बीडमध्ये नात्याला काळीमा, नराधम बापाचा पोटच्या मुलीवरच बलात्कार
2 तलवारीने केक कापणे पडले महागात, वाढदिवसालाच घडली तुरुंगवारी
3 गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या
Just Now!
X