आदित्य ठाकरे यांची ग्वाही

सोलापूर : ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती किंवा शेतीच्या अन्य प्रश्नांवर शेतक ऱ्यांनी निराश होऊन आयुष्याचे बरे-वाईट करून घेऊन नये. प्रत्येक अडचणीच्या काळात शिवसेनेला हाक द्यावी, प्रत्येक वेळी शिवसेना मदतीला धावून येईल, अशी ग्वाही शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्य़ात मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे आष्टी उपसा सिंचन योजनेच्यचा दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते  बोलत होते. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात शेकडो शेतक ऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून गेली २५ वर्षे रखडलेले आष्टी उपसा सिंचन योजना मार्गी लागत असल्याबद्दल सर्वानी समाधान व्यक्त केले.

या वेळी बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले,की सोलापूर जिल्ह्य़ात दुष्काळाचे संकट ओढवल्यानंतर गेल्या १२ फेब्रुवारी रोजी आपण येथे शेतक ऱ्यांना मदत करण्यासाठी आलो होतो. त्या वेळी आष्टी उपसा सिंचन योजना मार्गी लागण्यासाठी शिवसैनिकांच्या माध्यमातून गठित झालेल्या कृती संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आपणांस भेटून निवेदन दिले होते. १९९५-९७ च्यासुमारास युती सरकारने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून दुष्काळी भागात शेतीला पाणी देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला होता. त्याच अंतर्गत मोहोळ तालुक्यात आष्टी उपसा सिंचन योजनाही मंजूर झाली होती. त्याप्रमाणे योजनेचे काम सुरूही झाले होते. परंतु पुढे सत्तांतर झाले आणि गेली २५ वर्षे ही योजना रखडली होती. या प्रश्नाकडे या भागातील शेतकऱ्यांनी आपले लक्ष वेधल्यानंतर आपण केवळ जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे शब्द टाकला. तेव्हा अवघ्या चारच दिवसात शिवतारे यांनी प्रशासनाची बैठक घेऊन आष्टी उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला चालना देण्याचा निर्णय घेतला. शिवतारे यांची ही धडाडी कौतुकास्पद आहे. परंतु खरे श्रेय गेली २५ वर्षे पाण्यासाठी वाट पाहून संघर्ष करणाऱ्या शेतक ऱ्यांचे आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.

ही योजना लवकरात लवकर मार्गी लागणार असून त्यामुळे दोन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असा दावा ठाकरे यांनी केला. दुष्काळासह आणखी कितीही संकटे आली तरी शेतकरी हिमतीने परिस्थितीशी सामना करतो. आमचा शेतकरी सहजासहजी हार मानणारा नाही. परंतु अलीकडे प्रश्नच एवढे वाढले आहेत की त्यामुळे शेतकरी स्वत:चे बरे-वाईट करून घेत आहेत. हा मार्ग चुकीचा आहे. संकटे कितीही येऊ देत, शेतक ऱ्यांनी स्वत:चे बरे-वाईट करून न घेता प्रत्येक वेळी शिवसेनेला हाक द्यावी. त्यांच्या मदतीला शिवसेना मदतीला आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला.