पीक चांगले; पण व्यापाऱ्यांनी शेतमालाचा भाव पाडल्याने चिंतेचे ढग

नांदेडमधील मालेगाव. नाव प्रल्हाद इंगोले. सहा एकरचे शेतजमिनीचे धनी. पण, पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर ते निर्धन झाले आहेत. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांची तारेवरची करसत सुरू असताना चलनटंचाईचा फायदा घेत व्यापाऱ्यांनीही त्यांची लुबाडणूक सुरू केली. सोयाबिनची प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत २८०० रुपये असताना व्यापारी फक्त २५०० रुपये देऊ करीत आहेत. त्यामुळे खिसा रिकामा असताना कमी किमीत शेतमाल विकावा की पोटाला चिमटा काढत आणखी काही काळ वाट पाहावी, असा प्रश्न प्रल्हाद इंगोले यांना पडला आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त अनेक भागांतही थोडय़ाफार प्रमाणात हीच चित्र दिसत आहे.

मालेगावमध्ये एकमेव एटीएम आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियाचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा गेल्या मंगळवारी केल्यापासून हे एटीएमही बंद आहे, असे इंगाले यांनी सांगितले. मालेगावातील बहुतेक ग्रामस्थ शेती आणि शेतीसंबंधित व्यवसाय करतात. सुमारे १० हजार वस्ती असलेल्या मालेगावातील जवळपास ८० टक्के व्यवहार रोखीनेच होतात. त्यामुळे नोटाबंदीचा मोठा फटका बसल्याचे इंगोले सांगतात.

मालेगावात स्टेट बँकऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि नांदेड जिल्हा सहकारी बँका या बँकांच्या शाखा आहेत. मात्र, या बँका दोन हजाराच्या नोटा वितरित करीत असल्याने त्याचा फारसा फायदा होत नाही. इतक्या मोठय़ा मूल्याच्या नोटा कोणाकडेही सुटय़ा होत नाहीत. अगदी भाजीपाला विकत घेणेही अवघड झाले आहे. पेट्रोल, डिझेल आणि औषधेही मिळण्यातही अडचणी आहेत. छोटे व्यावसायिक पाचशे आणि हजारच्या नोटा घेत असले तरी ते सुटे देऊ शकत नसल्याने व्यवहार थंडावले आहेत. त्यामुळे अनेक छोटे व्यवसाय आणि दुकानदारांना फटका बसल्याचे इंगोले म्हणाले. दुष्काळग्रस्त नांदेडसह मराठवाडय़ात यंदा अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सलग दोन वर्षे दुष्काळ पडल्यानंतर यंदा चांगले पीक आल्याने मालेगावमधील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते.

मात्र, नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू केली आहे. व्यापारी प्रति क्विंटल सोयाबिनला २५०० रुपयांचा भाव देऊ करीत आहेत. या भावात शेतमाल विकण्यास तयार नसलेल्या शेतकऱ्यांना आणखी १० ते १५ दिवस थांबण्याचा सल्ला व्यापारी देत आहेत.

शेतमाल विक्रीस नकार

प्रल्हाद इंगोले यांच्याकडे ४० क्विंटल सोयाबिन आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याने त्यांनी सोयाबिन विक्रीस नकार दिला आहे. परिस्थिती सुधारेपर्यंत सोयाबिनची विक्री करणार नसून चांगला भाव मिळाल्यानंतर विक्री करणार असल्याचे इंगोले यांनी सांगितले. मात्र, पत्नीसह दोन मुलांच्या कुटुंबाचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.