जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय नाहीच; देवस्थान समितीचा महिला प्रवेशाला विरोध
शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांकडे, सरकार दरबारी टोलवण्यात आला आहे. प्रवेशाची मागणी करणारे व विरोध दर्शवणारे अशा सर्व संबंधितांनी आज, शनिवारी आयोजित केलेल्या बैठकीत मांडलेल्या मतांचा अहवाल जिल्हाधिकारी अनिल कवडे दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत. बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य करु असे देवस्थान ट्रस्ट व भूमाता ब्रिगेड रणरागिणी प्रतिष्ठानने मान्य केले तर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सरकारचा निर्णय सकारात्मकच हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र ग्रामस्थांची देवस्थान बचाव कृती समिती, सरपंच आदींनी मात्र महिलांच्या प्रवेशास विरोध कायम ठेवला.
शनिशिंगणापूरच्या वादाची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरुन जिल्हाधिकारी कवडे यांनी आज सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली होती.
बैठक बंद दालनात
महिलांचा सन्मान राहिला पाहिजे त्याचबरोबर ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट यांना गृहीत धरुन निर्णय व्हावा. मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य केला जाईल, असे आ. मुरकुटे यांनी सांगितले. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सांगितले की, देवस्थानने पुरुषी मानसकिता झुगारुन नवा आदर्श घडवावा. सरकारने महिला प्रवेशाचा सकारात्मक निर्णय घ्यावा, सरकारचा निर्णय आम्ही मान्य करु. यासाठी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत.
अंनिसच्या अ‍ॅड. रंजना गवांदे म्हणाल्या की, देवस्थान ट्रस्टने भारतीय राज्य घटनेचा आदर करावा, कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात महिलांना प्रवेश मिळाला, तसा तो शनिशिंगणापूरलाही मिळावा.
देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष अनिता शेटे, उपाध्यक्ष बानकर, खजिनदार योगेश बानकर यांनी सांगितले की, सरकार व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून काढलेला मार्ग मान्य केला करू असे स्पष्ट केले.