सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप नेते एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील (आयपीसी) कलम ५०९ (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव किंवा शब्दांचा वापर करणे) अंतर्गत खडसेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. अंजली दमानिया यांनी बुधवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एकनाथ खडसे यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या भाषणात खडसे यांनी आपल्याबद्दल आक्षेपार्ह आणि असभ्य भाषा वापरली, असे दमानियांनी म्हटले होते. खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खडसेंनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप होता. याप्रकरणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दमानिया यांनी वाकोला पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असून, राज्यात महिला असुरक्षित आहेत, असा दावा दमानिया यांनी केला होता. आयपीसीतील कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा जळगावच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण जळगाव पोलिसांकडे वर्ग केले जाईल असे समजते. गुन्हा दाखल झाल्याने खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, बुधवारी दमानिया यांचे आरोप खडसेंनी फेटाळून लावले होते. मी कोणत्याही महिलेचा अवमान करणारे वक्तव्य केलेले नाही, दमानिया यांना उद्देशून बोललेलो नाही असे खडसे यांनी म्हटले होते. दमानिया यांचा माझ्यावरच आरोप करण्यामागे काही हेतू आहे का, दरवेळी फक्त मलाच का टार्गेट केले जाते, असा सवाल त्यांनी विचारला होता.