20 September 2020

News Flash

‘सांसद आदर्श ग्राम’ची पहिली कार्यशाळा हिवरेबाजारला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेतील देशातील पहिली कार्यशाळा नगर जिल्हय़ातील आदर्श गाव हिवरेबाजार येथे उद्या, सोमवारी आयोजित करण्यात आली आहे.

| December 1, 2014 03:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेतील देशातील पहिली कार्यशाळा नगर जिल्हय़ातील आदर्श गाव हिवरेबाजार येथे उद्या, सोमवारी आयोजित करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे-मुंडे यांच्याच पुढाकारातून ही कार्यशाळा हिवरेबाजारला होत आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील खासदार, ४८ गावांचे सरपंच, तज्ज्ञ यांना या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
पंकजा पालवे-मुंडे यांचे सकाळी पुण्याहून हिवरेबाजारला आगमन होईल. १० वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होईल. कार्यशाळा दुपारी २ पर्यंत चालेल. दुपारी अडीचनंतर सरपंच पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली गावात झालेल्या विविध विकासकामांची पाहणी केली जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता पालवे-मुंडे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा होईल. सांसद आदर्श ग्राम योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने ही योजना महाराष्ट्रात कशा पद्धतीने राबवली जाणार हे या कार्यशाळेतून स्पष्ट होणार आहे. पालवे-मुंडे यांनीच त्यासाठी आदर्शगाव हिवरेबाजारची निवड केल्याचे समजले.
राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने यापूर्वीही ग्रामविकासाचे अनेक प्रकल्प, योजना राबवल्या, त्यातील अनेक योजनांची सुरुवात नगर जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून झालेली आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नातून या योजनांना चांगला प्रतिसादही मिळाला व त्यातून अनेक गावांना मोठय़ा प्रमाणावर अनुदानाचा लाभही मिळाला. यातून अनेक गावांत विकासकामे उभी राहिली. त्याला लोकसहभागाची जोडही चांगली मिळाली.
काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवला त्याची सुरुवातही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावातून झाली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना स्वजलधारा योजना सुरू करण्यात आली होती, त्याची सुरुवातही माळकूप, काळकूप गावातून झाली होती. महाराष्ट्रातील पहिले पाणंदमुक्त गावही संगमनेरमधील बोरबन ठरले होते. पर्यावरण संतुलन आदर्श गाव योजनेची पहिली कार्यशाळाही हिवरेबाजारला झाली होती. जिल्हा परिषदेच्या कुपोषण निर्मूलनाच्या ‘होम व्हीसीडीसी’ प्रकल्पाची दखल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली व ‘युनिसेफ’ संस्थेने त्यावर फिल्मही तयार केली. ही योजना आता सर्वत्र लागू करण्यात आली आहे. जिल्हय़ातील सर्वच १४ तालुक्यांतील पंचायत समितींना एकाच वेळी नवीन इमारती मंजूर होण्याचा मानही जिल्हा परिषदेला मिळाला होता. हा टाइप प्लॅन नंतर इतर जिल्हय़ातील पंचायत समितींना लागू करण्यात आला होता.
नगर जिल्हा परिषदेने केंद्र सरकारचा पुरस्कार व राज्य सरकारचा सलग तीन वर्षे यशवंत पंचायत राज पुरस्कार पटकावला होता. या पाश्र्वभूमीवर सांसद आदर्श ग्राम योजनेची सुरुवातही नगरमधून होत असल्याने ही योजनाही यशस्वी होईल, असा विश्वास प्रशासनातील अधिकाऱ्यांना वाटतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 3:30 am

Web Title: first workshop on hivarebajar of sansad adarsh gram
Next Stories
1 ‘चित्रपट महामंडळातील कारभार भ्रष्टाचाराने बरबटलेला’
2 अतिरिक्त उत्पादनामुळे सहकारी दूध संघ अडचणीत
3 जिल्हा बँकेच्या वसुलीबाबत आज सहकारमंत्र्यांबरोबर बैठक
Just Now!
X