सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आज धुवाँधार कोसळणाऱ्या पावसामुळे आंबेरी व होडावडा नद्यांना महापूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे घरांची, मांगरांची पडझडही झाली.
माणगाव खोऱ्यातील आंबेरी नदीला महापूर आल्याने कुडाळ ते आंबेरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली, तसेच होडावडा नदीला पूर आल्याने तळवदे गावालाही पुराच्या धोक्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या पुरामुळे सावंतवाडी-तळवडे-वेंगुर्ले मार्गावरील वाहतूक थांबली.
या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तसेच तेरेखोल नदीला महापूर आल्याने त्या नदीच्या काठावरील गावांतही महापुराची भीती होती. या भीतीमुळे लोकांनी शेतीची कामे दिवसा लवकरच आटोपती घेतली.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात दिवसभर पाऊस कोसळत आहे. नदी-नाल्यांना महापूर आले आहेत. मात्र घाट सुरक्षित आहेत, असे आपत्कालीन कक्षातून सांगण्यात आले. आज दिवसभर धुवाँधार पाऊस कोसळत होता. गुरुवारी सकाळी नोंदलेला आठही तालुक्यांतील पावसाची नोंद ६५७ मि.मी. म्हणजेच सरासरी ८२.१३ एवढी झाली आहे. कणकवलीत सर्वाधिक १०३ मि.मी. एवढा पाऊस नोंदला. अन्य तालुक्यांत कुडाळ १०२ मि.मी., दोडामार्ग ८६ मि.मी., सावंतवाडी ८२ मि.मी., वैभववाडी ७९ मि.मी., देवगड ७१ मि.मी., वेंगुर्ले ७० मि.मी. व मालवण ६४ मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर साचलेले पाणी पाहता रस्ते खड्डय़ातील नदी बनले आहेत. ग्रामीण भागात रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य असल्याने खड्डय़ात पाणी साचल्याने खड्डय़ांचा आकार कळून येत नसल्याने वाहनचालकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.