News Flash

मुंबईकरांसाठी धरणं भरली, पण शहापूर मात्र गेलं पाण्याखाली!

शहापूरमध्ये सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली खरी, पण या पावसाने शहापूर मात्र पाण्याखाली गेलं.

सापगाव गावाजवळील भातसा नदीवरील पूल पावसाच्या तडाख्यापुढे अशा अवस्थेप्रत आला!

गेल्या दोन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने दाणादाण उडविली असून नागरिकांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली आहे. शहापूर तालुक्यातील मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणारी तानसा व मोडकसागर धरणे भरून वाहू लागल्याने मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला असला तरी तालुक्यात धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे अपरिमित हानी झाली आहे. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. पुलावरील रस्ते उखडले, रेलिंग निखळल्या, दरड कोसळली, घरे कोसळली, मोऱ्या वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, दुकानात पाणी शिरल्याने मालाची नासाडी झाली तर घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांना आपल्या कुटुबीयांसह रात्र अक्षरशः जागून काढावी लागली आहे.

२४ तासांत तुफान पाऊस!

शहापूर तालुक्यात गेल्या २४ तासांत तुफान पाऊस झाला असून मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणारी तानसा व मोडकसागर धरणे भरून वाहू लागली आहेत, तर भातसा धरणात ६५ टक्के पाणी साठा झाला आहे. यामुळे मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला आहे. मात्र, दुसरीकडे रौद्ररूप धारण केलेल्या पावसाने तालुक्यात हाहा:कार माजवला असून तालुक्यातील अल्याणी – नांदवळ गावात काळू नदीचे पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली असून त्यांचा संसार उध्वस्त झाला आहे.

घरांची झाली पडझड…

शहापुरातील कळंभे – गुजराथी बागेतील इमारतींमध्येही भारंगी नदीचे पाणी शिरल्याने अनेक घरांचे व त्यांच्या संसारोपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले असून पुराच्या पाण्याने येथील नागरिक महिला भगिनींनी रात्र अक्षरशः जागून काढली. तालुक्यातील कसारा – तानाजीनगर येथे दरड कोसळल्याने विमल मराडे, नामदेव जाधव, काळूराम जाधव यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले असून काही घरांची पडझड झाली आहे. येथील कुटुंबियांना जिल्हा परिषद शाळा व समाज मंदिरात हलविण्यात आले आहे. लेनाड येथील पाच घरे पाण्याखाली गेली असून तेथील कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याचे महसूल विभागातून सांगण्यात आले. तर शहापूर लगत असलेल्या वाफे पाडा येथील सत्यधाम आश्रमाची वाताहत झाली आहे. भारंगी नदीला आलेल्या पुरामुळे येथील पत्र्याचे शेड कोसळले असून गोशाळेतील गायींचा खाणा व चारा पूर्णतः भिजून गेला आहे. काही गायी पाण्यात वाहून चालल्या होत्या त्यांना शेतकरी अशोक गडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्थीच्या प्रयत्नांनी वाचविले. सुदैवाने त्यांना वाचविल्यानंतर पत्र्याचे शेड कोसळले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

चिपळूणच्या नाकातोंडात पाणी! रायगड, रत्नागिरीत हाहाकार; मदतकार्याला युद्धपातळीवर वेग

गावांचा संपर्क तुटला!

तालुक्यातील शहापूर शहराला जोडणाऱ्या सापगाव येथील पुलावरून भातसा नदीचे पाणी गेल्याने या पुलावरील रस्ता पूर्णतः उखडला असून पुलाच्या दोन्ही बाजूचे रेलिंग उद्ध्वस्त झाले आहे. सुरक्षितता म्हणून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असल्याने पुला पलीकडील शेणवा, डोळखांब, किन्हवली व मुरबाड रस्त्यावरील सुमारे १५० गावांचा शहापुरशी संपर्क तुटला आहे. यांसह डोळखांब – चोंढे मार्गावरील मोरी, वरस्कोळ – कुंभ्याचापाडा मार्गावरील मोरी, टेंभा – वाडा मार्गावरील बेलवड जवळील मोरी वाहून गेल्याने या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, नायब तहसीलदार सत्यजीत चव्हाण व आपत्ती व्यवस्थापन समितीचे चे कर्मचारी यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.

रेल्वे ठप्प, चाकरमान्यांचे हाल

दरम्यान, मध्य रेल्वेच्या उंबरमाळी रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने तसेच वासिंद – टिटवाळा दरम्यान रेल्वे ट्रॅक खचल्याने रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून चाकरमानी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. कसारा रेल्वे स्थानकात अडकलेल्या असंख्य प्रवाशांना लालपरीने इच्छित स्थळी सोडले आहे.

आज झालेला पाऊस

शहापूर – ३३६ मिमी
वासिंद – २०५ मिमी
खर्डी – ३४६ मिमी
किन्हवली – २५० मिमी
डोळखांब – २४१ मिमी

धरण परिसरात आजपर्यंत झालेला पाऊस

मोडकसागर – १५८१ मिमी
भातसा – १४५१ मिमी
तानसा – १५१३ मिमी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 7:18 pm

Web Title: heavy rainfall in shahapur water logging modaksagar bhatsa dam overflow pmw 88
टॅग : Dam
Next Stories
1 चिपळूणच्या नाकातोंडात पाणी! रायगड, रत्नागिरीत हाहाकार; मदतकार्याला युद्धपातळीवर वेग
2 फडणवीसांसाठी काय पण… कार्यकर्त्यांनी जलयुक्त शिवारच्या ओसंडून वाहणाऱ्या बंधाऱ्यात उतरून दिल्या शुभेच्छा
3 “समाजाला अनिश्चित काळासाठी बंद करून ठेवणार आहात का?”
Just Now!
X